'त्या' विधानावरून रोहित पवारांची राम कदमांवर टीका; म्हणाले, "आता पोलिसांवर हात उचलणाऱ्यांवर..."

By जयदीप दाभोळकर | Published: January 12, 2021 06:19 PM2021-01-12T18:19:47+5:302021-01-12T18:30:14+5:30

राम कदमांनी मारहाण झालेल्या पोलिसाला फोन केल्याचं प्रकार आला होता उघडकीस

ncp leader rohit pawar criticize bjp leader ram kadam after his viral communication about police constable | 'त्या' विधानावरून रोहित पवारांची राम कदमांवर टीका; म्हणाले, "आता पोलिसांवर हात उचलणाऱ्यांवर..."

'त्या' विधानावरून रोहित पवारांची राम कदमांवर टीका; म्हणाले, "आता पोलिसांवर हात उचलणाऱ्यांवर..."

googlenewsNext
ठळक मुद्देराम कदमांनी पोलीस कर्मचाऱ्याला फोन केल्याचं झालं होतं उघडभाजपाची विचारसरणी कशी आहे हे समजत असल्याचं रोहित पवारांचं वक्तव्य

पवई पोलिसांच्या एका कॉन्टेबलला भाजपच्या कार्यकर्त्यांनी बेदम मारहाण केल्याची घटना समोर आली होती. आरोपी हे आमदार राम कदम यांचे कार्यकर्ते असून त्यांना वाचविण्यासाठी राम कदम यांनी मारहाण झालेल्या पोलिसाला फोन केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि आमदार रोहित पवार यांनी राम कदम यांच्यावर जोरदार टीका केली आहे.

"मुंबई पोलिसांना माफिया म्हणणाऱ्यांच्या बाजूने भाजपाच्या नेत्यांनी यापूर्वी आंदोलन केलं. आता मुंबई पोलिसांवर हात उचलणाऱ्यांवर कारवाई करू नका, म्हणण्यापर्यंत त्यांची मजल गेली आहे. यावरुनच यांची विचारसरणी कशी आहे, हे लोकांना समजतंय. यापलीकडं आपण काय बोलणार?," असं म्हणता रोहित पवार यांनी राम कदम यांच्यावर निशाणा साधला. त्यांनी ट्वीट करत कदम यांच्यावर टीका केली. 



काय आहे प्रकरण ?

नितीन खैरमोडे असं मारहाण झालेल्या पोलीस कॉन्स्टेबलचं नाव आहे. खैरमोडे यांनी भाजपाच्या सचिन तिवारी, दिपू तिवारी आणि आयुष राजभर या कार्यकर्त्यांनी मारहाण केली होती. या तिघांना वाचविण्यासाठी राम कदम यांनी खैरमोडे यांना फोन केला. राम कदम आणि खैरमोडे यांच्यात झालेल्या संवादाची ऑडिओ क्लिप समोर आली आहे. "तुम्हाला झालेल्या मारहाणीचं मी समर्थन करत नाही. पण मानवतेच्या दृष्टीकोनातून आणि त्या तिघांच्या भविष्याचा विचार करा. त्या तिघांच्या करिअरचा प्रश्न आहे. त्यांचं लग्नही झालेलं नाही", असं सांगत राम कदम यांनी खैरमोडे यांच्याकडे तक्रार मागे घेण्याची मागणी केली. दरम्यान, कॉन्स्टेबल खैरमोडे यांनी महाराष्ट्र पोलिसांच्या प्रतीमेचा प्रश्न असून असं करणं योग्य ठरणार नाही, असं ठामपणे सांगून राम कदम यांच्या मागणीला स्पष्ट नकार दिला.

पवईच्या हिरानंदानी येथे गॅलरिया मॉलजवळ एका ज्येष्ठ महिला डॉक्टरच्या गाडीला भाजपाच्या कार्यकर्त्यांनी दुचाकीवरुन येत धडक दिली होती. नियमांचं उल्लंघन करत हे भाजपाचे कार्यकर्ते ट्रिपल सीट प्रवास करत होते. यावेळी घटनास्थळी पोलीस कॉन्स्टेबल नितीन खैरमोडे दाखल झाले. त्यांनी आरोपींना ताब्यात घेतलं. त्यानंतर रिक्षाने नेत असताना कार्यकर्त्यांनी रिक्षातच खैरमोडे यांना जबर मारहाण केली. त्यांच्या चेहऱ्यावर हातात घातलेल्या कड्याने वार केले. मारहाणीत खैरमोडे रक्तबंबाळ झाले होते.

Web Title: ncp leader rohit pawar criticize bjp leader ram kadam after his viral communication about police constable

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.