Maharashtra Politics: “सरकारच्या चुकीच्या आर्थिक धोरणांमुळे नाईलाजाने रेपो रेट वाढवण्याची वेळ RBIवर आली”
By ऑनलाइन लोकमत | Published: February 8, 2023 07:16 PM2023-02-08T19:16:09+5:302023-02-08T19:17:25+5:30
Maharashtra Politics: सरकारच्या चुकीच्या आर्थिक धोरणांमुळे सामान्य माणूस सातत्याने अडचणीत येत आहे, अशी टीका करण्यात आली आहे.
Maharashtra Politics: गेल्या अनेक दिवसांपासून महागाई, बेरोजगारी आणि अन्य मुद्द्यांवरून विरोधक केंद्रातील मोदी सरकारवर सडकून टीका करताना दिसत आहेत. यातच आता रिझर्व्ह बँकेने रेपो रेटमध्ये ०.२५ टक्क्यांची वाढ केली आहे. सध्या रेपो रेट हा ६.५० टक्क्यांवर पोहोचला आहे. रेपो रेट वाढल्याने सर्व प्रकारचे होम, ऑटो आणि पर्सनल लोन महागणार आहेत. यावरून राष्ट्रवादी काँग्रेसने केंद्रातील मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. सरकारच्या चुकीच्या आर्थिक धोरणांमुळे सामान्य माणूस सातत्याने अडचणीत येत आहे, अशी टीका करण्यात आली आहे.
रेपो रेट वाढल्यानंतर बँकांमधील मुदत ठेवींवर बँका अधिकचे व्याज देऊ शकतात. मात्र, हा निर्णय त्या त्या बँकेवरच अवलंबून आहे. रेपो रेटनंतर बँकांकडून कर्जांवरील व्याजदरात तातडीने वाढ होते. मात्र, ठेवींवर वाढ करून त्याचा ग्राहकांना फायदा होण्याचा निर्णय अनेकदा बराच उशिरा घेतला जातो, असे सांगितले जाते. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि आमदार रोहित पवार यांनी रिझर्व्ह बँकेने रेपो रेटमध्ये वाढ केल्यानंतर यावर ट्विटरच्या माध्यमातून प्रतिक्रिया व्यक्त केली.
सामान्य माणूस सातत्याने अडचणीत येत आहे
रोहित पवार आपल्या ट्विटमध्ये म्हणतात की, सरकारच्या चुकीच्या आर्थिक धोरणांमुळे सामान्य माणूस सातत्याने अडचणीत येत आहे. अशातच आरबीआयने रेपो रेटमध्ये ०.२५ टक्के वाढ केल्याने गृह, वाहन कर्ज, छोटे-मोठे व्यावसायिक यांची कर्जे महाग होऊन त्यांना अधिकच्या इएमआयचा भुर्दंड सहन करावा लागणार आहे. एकीकडे महागाई कमी होत नाही तर दुसरीकडे नुकत्याच सादर केलेल्या अंदाजपत्रकातूनही सामान्य माणसाला काहीही दिलासा दिसत नसल्याने नाईलाजाने रेपो रेट वाढवण्याची वेळ आरबीआयवर आल्याचे दिसतेय. त्यामुळे आर्थिक धोरणे आखताना सरकार यातून काहीतरी बोध घेईल, ही अपेक्षा! असे ट्विट रोहित पवार यांनी केले आहे.
दरम्यान, कोरोना काळामध्ये रेपोरेट हा ४ टक्क्यांवर स्थिर होता. मात्र त्यानंतर महागाई वाढल्याने रेपोरेटमध्येही सातत्याने वाढ करावी लागली. रिझर्व्ह बँकेने सलग सहा वेळा रेपो रेट वाढवला आहे. आता फेब्रुवारी महिन्यात रेपो रेट कम होईल अपेक्षा होती. मात्र रिझर्व्ह बँकेने या अपेक्षांना धक्का दिला आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"