Maharashtra Politics: “भोंदू बाबांच्या खांद्यावर बंदूक ठेवून गांधी नष्ट करण्याचे कुणी कितीही प्रयत्न केले तरी...”
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2023 17:20 IST2023-04-02T17:19:40+5:302023-04-02T17:20:33+5:30
Maharashtra News: बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री आणि कालिचरण महाराजांनी केलेल्या वादग्रस्त विधानावरुन पुन्हा एकदा आरोप-प्रत्यारोप होऊ लागले आहेत.

Maharashtra Politics: “भोंदू बाबांच्या खांद्यावर बंदूक ठेवून गांधी नष्ट करण्याचे कुणी कितीही प्रयत्न केले तरी...”
Maharashtra Politics:बागेश्वर धामचे पीठाधीश आणि कालिचरण महाराज यांनी केलेल्या विधानांवरून पुन्हा एकदा राज्यातील राजकीय वातावरण तापण्याची चिन्हे आहेत. या विधानावरून आता आरोप-प्रत्यारोप होऊ लागले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी ट्विट करत बागेश्वर बाबा आणि कालिचरण महाराजांनी केलेल्या विधानांचा तीव्र निषेध करत विरोधकांना सुनावले आहे.
रोहित पवार आपल्या ट्विटमध्ये म्हणतात की, श्री साईबाबा आणि महात्मा गांधी यांच्याबाबत दोन भोंदू बाबांनी केलेल्या वक्तव्याचा तीव्र निषेध! पण यानिमित्ताने महाराष्ट्रात होऊ घातलेल्या निवडणुका कोणत्या दिशेला नेण्यात येत आहेत, याचा अंदाज येऊ लागलाय, असे सूचक विधानही रोहित पवार यांनी केले आहे.
भोंदू बाबांच्या खांद्यावर बंदूक ठेवून गांधी नष्ट करण्याचे कुणी कितीही प्रयत्न केले तरी...
भोंदू बाबांच्या खांद्यावर बंदूक ठेवून गांधी नष्ट करण्याचे कुणी कितीही प्रयत्न केले तरी ते नष्ट होऊ शकत नाहीत, जगात गांधी विचार अजरामर आहे. पण हे विचार संपवण्याचा एका मोठ्या राजकीय पक्षाचा प्रयत्न आहे. त्यामुळं हिम्मत असेल तर भोंदूंच्या आडून ट्रायल घेण्यापेक्षा अधिकृत भूमिका घेण्याचे धाडस त्यांनी दाखवावे!, असे जाहीर आव्हान रोहित पवार यांनी दिले आहे.
लोक विचारत असलेल्या प्रश्नांची उत्तरे द्यावीत...
निवडणुका जवळ आल्या की तथाकथित बाबा-बुवा या भोंदू लोकांना पुढे करून वादग्रस्त विधाने करायला लावायची, जाती-जातीत, धर्मा-धर्मात वाद निर्माण करायचा आणि नॉन इश्यूवर चर्चा घडवून मुख्य प्रश्नांवरून लोकांचे लक्ष दुसरीकडे वळवायचे आणि आपली राजकीय भाकरी भाजायची, हे या पक्षाचे पहिल्यापासूनच धोरण राहिलेय... पण संतांच्या आणि शिव-शाहू-फुले-आंबेडकरांसारख्या महापुरुषांच्या महाराष्ट्राला हा डाव समजत नाही, या भ्रमातून या पक्षाने बाहेर यावे आणि बेरोजगारी, ढासळती अर्थव्यवस्था, बिघडलेली कायदा व सुव्यवस्था आणि बोकाळलेला भ्रष्टाचार याबाबत लोक विचारत असलेल्या प्रश्नांची उत्तरे द्यावीत..., या शब्दांत रोहित पवारांनी सुनावले आहे.
दरम्यान, साई बाबा संत असू शकतात. फकिर असू शकतात. पण ते देव होऊ शकत नाही, असे विधान बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांनी केले असून, जितके तुम्ही नथुराम गोडसे यांच्याबद्दल वाचणार तेवढे तुम्ही त्यांचे भक्त व्हाल. नथुराम गोडसे यांनी महात्मा गांधींच्या बाबत केले ते योग्य केले. नथुराम गोडसे नसते तर देशाचा नाश झाला असता, असे वक्तव्य कालिचरण महाराजांनी केले आहे. बागेश्वर बाबा आणि कालिचरण महाराजांच्या विधानांनंतर पुन्हा एकदा नवा वाद निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"