मंत्र्यांना निर्णय घेण्याचं स्वातंत्र्य नसणं, या संस्कृतीची भाजपच्या नेत्यांना सवय; रोहित पवारांचा टोला
By ऑनलाइन लोकमत | Published: January 16, 2022 11:37 AM2022-01-16T11:37:09+5:302022-01-16T11:40:53+5:30
कोरोना संदर्भात पंतप्रधानांसोबत झालेल्या बैठकीत उद्धव ठाकरे अनुपस्थित होते. यानंतर ते पालिकेच्या बैठकीला उपस्थित होते. यावरून भाजप नेत्यांनी त्यांच्यावर टीका केली होती.
देशभरात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर काळजी घेण्यात येत आहे. सर्वच राज्यातील सरकार कोरोना नियमावलींचे पालन करण्याचे आवाहन करत असून नागरिकांना गर्दी करण्यास मज्जाव करण्यात आला आहे. महाराष्ट्रात १५ फेब्रुवारीपर्यंत कडक निर्बंध लादण्यात आले आहेत. तर ५ राज्यातील निवडणुकांच्या प्रचारसंभा आणि रॅलींवरही बंदी घालण्यात आली आहे. त्याच पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अनेक राज्यातील मुख्यमंत्र्यांसमवेत व्हर्च्युअल संवाद साधला. यावेळी, महाराष्ट्रातून आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची उपस्थिती होती. परंतु यावेळी मुख्यमंत्री प्रकृतीच्या कारणास्तव उपस्थित राहू शकले नव्हते. यानंतर भाजपच्या काही नेत्यांनी यावर टीका केली होती. परंतु आता राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी भाजप नेत्यांवर पलटवार केला आहे.
"मंत्र्यांना निर्णय घेण्याचं स्वातंत्र्य नसणं, या संस्कृतीची भाजपच्या नेत्यांना सवय आहे. पण पंतप्रधानाच्या बैठकीला राज्याचे आरोग्यमंत्री हजर असताना, मुख्यमंत्री का उपस्थित राहिले नाहीत अशी टीका करणाऱ्या या नेत्यांनी हे केंद्राचं नाही, तर महाराष्ट्राचं सरकार आहे, हे लक्षात घ्यावं," असं रोहित पवार म्हणाले. त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून यावर निशाणा साधला. "तौक्ते वादळाच्या वेळेस पंतप्रधानांनी शेजारच्या राज्याची पाहणी करून त्यांना तातडीने हजार कोटी रुपयांची मदत केली आणि त्याचवेळी महाराष्ट्राला मात्र सापत्न वागणूक दिली. त्यावेळी मूग गिळून गप्प बसणारे भाजप नेते आज मात्र चढाओढीने मुख्यमंत्र्यांवर टीका करतात, हे आश्चर्यकारक आहे," असं पवार म्हणाले.
केवळ केंद्रीय नेतृत्वाला खूश करून त्यांची मर्जी सांभाळण्याची राजकीय भूमिका भाजपच्या नेत्यांकडून नेहमीच घेतली जाते. पण या राज्याचे आपण देणे लागतो, या भूमिकेतून कधीतरी राज्याच्या हिताची भूमिका घेण्याचं शहाणपण ज्या दिवशी त्यांना येईल, तो राज्यासाठी सुदिन असेल, असंही ते म्हणाले.
मंत्र्यांना निर्णय घेण्याचं स्वातंत्र्य नसणं, या संस्कृतीची भाजपच्या नेत्यांना सवय आहे. पण पंतप्रधानाच्या बैठकीला राज्याचे आरोग्यमंत्री हजर असताना, मुख्यमंत्री का उपस्थित राहिले नाहीत अशी टीका करणाऱ्या या नेत्यांनी हे केंद्राचं नाही तर महाराष्ट्राचं सरकार आहे, हे लक्षात घ्यावं.
— Rohit Pawar (@RRPSpeaks) January 16, 2022
नक्की काय घडलं?
नरेंद्र मोदी यांनी अनेक राज्यातील मुख्यमंत्र्यांसोबत व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला होता. या बैठकीला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे प्रकृतीच्या कारणामुळे हजर नव्हते. त्यांच्याऐवजी आरोग्य मंत्री राजेश टोपे यांची उपस्थिती होती. मात्र, मोदींसमवेतच्या या बैठकीत राजेश टोपेंनी बोलण्याची संधीच मिळाली नाही. त्यामुळे, त्यांनी आपले म्हणणे लेखी स्वरुपात मोदींकडे दिले.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे 'पोस्ट ऑपरेटिव्ह ट्रीटमेंमुळे बैठकीला हजर राहू शकले नाहीत. कारण, सलग २/३ तास त्यांना एका जागी बसणं शक्य नव्हतं. त्यामुळे लेखी पत्र देऊन मी महाराष्ट्राची बाजू मांडली, असे टोपे यांनी सांगितलं होतं.