Pune Bypoll Election 2023: “कसबा-चिंचवडचा भाजपविरोधी संभाव्य निकाल अमित शाहांनी हेरला असावा, म्हणूनच प्रचार करणं टाळलं”
By ऑनलाइन लोकमत | Published: February 19, 2023 05:30 PM2023-02-19T17:30:57+5:302023-02-19T17:31:36+5:30
Pune Bypoll Election 2023: अत्यंत अचूक अंदाज बांधणाऱ्या अमित शाहांनी प्रचार करणे टाळले, हे खूप काही सांगून जाणारे आहे, असे सांगत भाजपला टोला लगावण्यात आला.
Pune Bypoll Election 2023: एकीकडे केंद्रीय निवडणूक आयोगाने दिलेल्या निकालावरून राजकीय वातावरण तापलेले पाहायला मिळत असून, दुसरीकडे कसबा पेठ आणि चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीसाठीचा प्रचार शिगेला पोहोचल्याचे दिसत आहे. केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपचे दिग्गज नेते अमित शाह महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. पुण्यातील कार्यक्रमांना अमित शाहांनी हजेरीही लावली होती. यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि आमदार रोहित पवार यांनी खोचक टोला लगावला आहे.
कसबा पेठ आणि चिंचवड मतदारसंघात महाविकास आघाडी, भाजपचा जोरदार प्रसार सुरू असल्याचे सांगितले जात आहे. सत्ताधारी आणि विरोधी पक्षाचे अनेक नेते निवडणुकीच्या मैदानात उतरले आहेत. पुणे दौऱ्यावर येऊनही अमित शाह यांनी कसबा आणि चिंचवड पोटनिवडणुकीत भाजपचा प्रचार करणे टाळल्याचे सांगितले जात आहे. यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी टोला लगावला. रोहित पवारांनी ट्विट करत भाजपवर निशाणा साधला.
कसबा-चिंचवडचा भाजपविरोधी संभाव्य निकाल अमित शाहांनी हेरला असावा
अत्यंत अचूक अंदाज बांधणारे, सूक्ष्म रणनीतिकार, निवडणूक नियोजनातले निष्णात व्यक्तिमत्त्व म्हणजे अमित शाह. पुण्यात येऊनही त्यांनी कसबा आणि चिंचवडला प्रचार करणं टाळलं, हे खूप काही सांगून जाणारं आहे. कदाचित प्रदेश भाजपाविरोधातील असंतोष आणि संभाव्य ‘निकाल’ त्यांनीही हेरला असावा!, असे ट्विट रोहित पवार यांनी केले आहे.
दरम्यान, केंद्रीय निवडणूक आयोगाने शुक्रवारी पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हाबाबतचा निकाल शिंदे गटाच्या बाजूने दिला. यानंतर शनिवारी गृहमंत्री अमित शाह, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुण्यात एकाच मंचावर आले होते. २०१४ ते २०२२ पर्यंत काळ हा सुवर्णाक्षरात लिहिला जाईल. ७० वर्ष ज्यांनी राज्य केले त्यावेळी लोक त्रास आणि समस्यांना सामोरे जात होते. मात्र आज परिस्थितीत तशी नाही. गरिबांना घरे मिळाली आहेत. गॅसही मिळाला आहे. मोदींच्याच काळात हे शक्य झाले आहे, असे अमित शाह यांनी सांगितले.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"