गॅस सिलिंडरची दरवाढ केल्याबद्दल महागाई सम्राट मोदीजींचे आभार; रुपाली चाकणकर यांचा टोला
By ऑनलाइन लोकमत | Published: September 1, 2021 04:23 PM2021-09-01T16:23:38+5:302021-09-01T16:26:06+5:30
Gas Cylinder Price Hike : बुधवारी गॅस सिलिंडरच्या दरात करण्यात आली २५ रूपयांची वाढ. विरोधकांनी साधला केंद्र सरकारवर निशाणा.
देश सध्या कोरोनाच्या संकटाचा सामना करत आहे. महागाईने सर्वसामान्यांचं कंबरडं मोडलं आहे. याच दरम्यान आता लोकांना आणखी एक मोठा फटका बसला आहे. सिलिंडरच्या किंमतीत पुन्हा एकदा वाढ झाली असून १५ दिवसांत तब्बल ५० रुपयांनी महागला आहे. दरम्यान, १ सप्टेंबर रोजी गॅस सिलिंडरच्या दरात २५ रूपयांची वाढ करण्यात आली. यावरून राष्ट्रवादी काँग्रेसनं भाजपवर टीकेचा बाण सोडला आहे. या दरवाढीवरून राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या महाराष्ट्रच्या प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी केंद्रावर निशाणा साधला आहे.
"आज पुन्हा घरगुती गॅस सिलेंडरच्या किमतीत २५ रुपये व कमर्शियल गॅस सिलेंडरच्या किमतीत ७५ रुपयांची भाववाढ केल्याबद्दल महागाई सम्राट मोदीजींचे मनःपूर्वक आभार. महागाईनं जनतेचं कंबरडं मोडल्याबद्दल धन्यवाद मोदीजी," असं म्हणत रुपाली चाकणकर यांनी टोला लगावला. त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून दरवाढीवर टीका केली.
आज पुन्हा घरगुती गॅस सिलेंडरच्या किमतीत २५ रुपये व कमर्शियल गॅस सिलेंडरच्या किमतीत ७५ रुपयांची भाववाढ केल्याबद्दल महागाई सम्राट मोदीजींचे मनःपूर्वक आभार..!
— Rupali Chakankar (@ChakankarSpeaks) September 1, 2021
महागाईने जनतेचे कंबरडे मोडल्याबद्दल धन्यवाद मोदीजी ! pic.twitter.com/jcSpffsD7N
१५ दिवसांत ५० रूपयांची वाढ
१५ दिवसांत विना सब्सिडी एलपीजी सिलिंडर ५० रुपयांनी महागला आहे. १ सप्टेंबर रोजी एलपीजी सिलिंडरमध्ये २५ रुपयांची वाढ झाली आहे. याआधी पेट्रोलियम कंपन्यानी १८ ऑगस्ट रोजी गॅस सिलिंडरच्या किमतीत २५ रुपयांची वाढ केली होती. दिल्लीमध्ये आता १४.२ किलोग्रॅमच्या विना सब्सिडी एलपीजी सिलिंडरच्या किमतीत २५ रुपयांनी वाढली आहे. या वाढीनंतर दिल्लीत १४.२ किलोग्रॅमच्या सिलिंडरचा दर ८८४.५० रुपये इतका झाला आहे.