भाजपच नव्हे, राष्ट्रवादीच्या नेत्यांची सुद्धा जाहिरातबाजी करुन पूरग्रस्तांना मदत
By ऑनलाइन लोकमत | Published: August 10, 2019 03:06 PM2019-08-10T15:06:12+5:302019-08-10T19:15:56+5:30
पूरग्रस्तांना पुरविण्यात येणाऱ्या मदत पॅकेटवर जयंत पाटील यांचे स्टीकर लावले असल्याचे स्पष्ट दिसत आहे.
मुंबई - कोल्हापूर अन् सांगलीतील पूरस्थितीने अवघा महाराष्ट्र हळहळला आहे. एकीकडे अशी परिस्थिती असताना, सरकार चक्क जाहिरातबाजी करुन पूरग्रस्तांना मदत करत असल्याचे समोर आले होते. यावरून भाजपवर मोठ्याप्रमाणात टीका होताना पाहायला मिळाले. मात्र सरकारवर टीका करणाऱ्या राष्ट्रवादी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचा सुद्धा आता एक फोटो वायरल झाला असून, त्यात पूरग्रस्तांना पुरविण्यात येणाऱ्या मदत पॅकेटवर जयंत पाटील यांचे स्टीकर लावले असल्याचे स्पष्ट दिसत आहे.
जयंत पाटील यांनी फेसबुक वर टाकलेल्या फोटोमध्ये पूरग्रस्तांना देण्यात येणाऱ्या बॉक्सवर जयंत पाटील यांचे स्टीकर लावलेले असल्याचे स्पष्ट दिसत आहे. त्यामुळे मुख्यमंत्री फडणवीसांच्यानंतर आता जयंत पाटील यांच्यावर सोशल मिडीयावर मोठ्याप्रमाणात टीका होताना दिसत आहे.
सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यात आलेल्या महापूरामुळे तेथील जनजीवन विस्कळीत झाले आहे. पाण्यात अडकलेल्यांना बाहेर काढण्यासाठी शर्यतीची प्रयत्न केले जात आहे. एकीकडे अशी परिस्थिती असताना, राजकीय नेत्यांकडून चक्क जाहिरातबाजी करुन पूरग्रस्तांना मदत करण्यात येत असल्याचे समोर आले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आमदार सुरेश हाळवणकर यांचे फोटो असलेले स्टीकर लावण्यात आलेले मदत पॅकेटची घटना समोर आली असतानाच, आता राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सुद्धा पूरग्रस्तांना मदत करताना मदत पॅकेटवर स्व:ताची फोटो लावून जाहिरातबाजी केली असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे सोशल मिडीयावर भाजपप्रमाणेच आता राष्ट्रवादी पक्षाला सुद्धा नेटकरी मोठ्याप्रमाणात ट्रोल करत आहे.