राष्ट्रवादीने कोपरी काँग्रेससाठी सोडली!

By admin | Published: April 27, 2016 03:39 AM2016-04-27T03:39:46+5:302016-04-27T03:39:46+5:30

विधानपरिषदेची निवडणूक सुरळीत व्हावी यासाठी राष्ट्रवादीचे संभाव्य उमेदवार वसंत डावखरे यांनी आता आपल्या मतांची जुळवाजुळव करण्यासाठी जोरदार हालचाली सुरु केल्या आहेत.

NCP left for Kopri Congress | राष्ट्रवादीने कोपरी काँग्रेससाठी सोडली!

राष्ट्रवादीने कोपरी काँग्रेससाठी सोडली!

Next

अजित मांडके,

ठाणे-विधानपरिषदेची निवडणूक सुरळीत व्हावी यासाठी राष्ट्रवादीचे संभाव्य उमेदवार वसंत डावखरे यांनी आता आपल्या मतांची जुळवाजुळव करण्यासाठी जोरदार हालचाली सुरु केल्या आहेत. कोपरी प्रभाग समिती ही पूर्वी राष्ट्रवादीकडे होती. विधान परिषदेची आगामी निवडणूक डोळ्यासमोर ठेवून ती तुम्हाला विधान परिषदेसाठी मदत हवी असेल तर तुमचा उमेदवार मागे घ्या असे आवाहन काँग्रेसने करताच राष्ट्रवादीने आपला उमेदवार मागे घेतला आहे. परंतु परस्पर उमेदवार मागे घेतल्याने आमदार जीतेंद्र आव्हाड गटाला धक्का बसला आहे. त्यामुळे आता शहरात पुन्हा आव्हाड गट विरुद्ध डावखरे गट असा वाद रंगणार असल्याची चिन्हे आहेत.
जून महिन्यात विधान परिषदेसाठी निवडणूक होणार आहे. ही माझी शेवटची निवडणूक असल्याचे सांगत डावखरे यांनी आपली सर्व ताकद पणाला लावली आहे.
दरम्यान बहुजन विकास आघाडीने राष्ट्रवादीला मदत करण्याचे मान्य केले आहे, त्यामुळे या मतांचा लाभ डावखरेंना मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही. परंतु ही निवडणूक पुन्हा बिनविरोध व्हावी यासाठी व्युव्हरचना त्यांनी आखली आहे. त्याचाच एक भाग म्हणून की काय, कोपरी प्रभाग समितीवर यापूर्वी राष्ट्रवादीचा वरचष्मा होता. परंतु, काँग्रेसने विधानपरिषदेसाठी मदत हवी असल्याची गळ घालताच राष्ट्रवादीने येथून लगेचच माघार घेतली.
प्रत्यक्षात येथील पक्षीय बलाबल पाहता ही प्रभाग समिती मनसेकरवी शिवसेनेच्या ताब्यात जाण्याची शक्यता आहे. त्यामुळेच कदाचीत त्यांच्या हा खेळीचाच भाग म्हणावा लागणार आहे. एकीकडे काँग्रेसला आपल्याकडे करुन त्यांनी शिवसेनेच्या विरोधात आपला उमेदवार उभा न करता अप्रत्यक्षरित्या येथे शिवसेनेचाही पाठिंबा मिळविला आहे.
त्यांच्या या खेळीमुळे मात्र आव्हाड गटात संतापाची लाट उसळली असून त्यांनी परस्पर उमेदवारी मागे घेण्यावरुन नाराजी व्यक्त केली. परंतु, यातूनही डावखरे गटाने आव्हाड गटाला शह देऊन आपले ‘डाव’ खरे करण्याचा हा प्रयत्नच केल्याचे दिसून येत आहे.
>राष्ट्रवादीकडून वसंत डावखरे हे एकमेव संभाव्य उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात असले तरीदेखील शिवसेनेमध्ये अनेक इच्छुकांची भाऊगर्दी सुरु झाली आहे. शिवसेनत ठाण्यातून रवींद्र फाटक, अनंत तरे, एच. एस. पाटील यांच्यासह अन्य दोघांची नावे रेसमध्ये असतांनाच आता गोपाळ लांडगे आणि अंबरनाथचे माजी नगराध्यक्ष सुनील चौधरी यांचेही नाव पुढे आले आहे.
परंतु, शिवसेना कोणाच्या पारड्यात उमेदवारी टाकणार हे आगामी काळ ठरविणार आहे. दरम्यान २०१० मध्ये झालेल्या विधान परिषदेच्या निवडणुकीत शिवसेनेने ठाण्याबाहेरील रमेश म्हात्रे यांना उमेदवारी दिली होती. परंतु,ऐनवेळेस त्यांना माघार घेण्यास भाग पाडले होते.
तिच खेळी आता पुन्हा डावखरेंसाठी खेळण्याची तयारी शिवसेनेने केल्याची चर्चा सुरु आहे. बाहेरील उमेदवार द्यायचा आणि त्याला पाडायचे अथवा ऐनवेळेस त्याला माघार घ्यायला लावायची, अशी चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरु आहे.

Web Title: NCP left for Kopri Congress

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.