“भाजपवाले शिवसेनेवर ‘त्या’ गोष्टीचा राग काढत आहेत”; राष्ट्रवादीचा मोठा आरोप
By ऑनलाइन लोकमत | Published: March 23, 2022 05:31 PM2022-03-23T17:31:16+5:302022-03-23T17:32:30+5:30
सत्ता स्थापन करता आली नाही म्हणून भाजपाची तडफड सुरू असून, लोकांच्या आता ते लक्षात येत असल्याचे राष्ट्रवादीने म्हटले आहे.
मुंबई: आताच्या घडीला महाविकास आघाडी (Maha Vikas Aghadi) आणि भाजपमध्ये सातत्याने विविध मुद्द्यांवरून आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. यातच आता सक्तवसुली संचालनालयाने (ED) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांचे मेहुणे श्रीधर पाटणकर यांच्या श्री साईबाबा गृहनिर्मिती कंपनीवर कारवाई करत ठाण्यातील निलांबरी प्रकल्पातील ११ सदनिकांवर टाच आणली. केंद्रीय संस्थेने थेट मुख्यमंत्र्यांच्या मेहुण्यांविरोधात कारवाई केल्याने महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळामध्ये एकच खळबळ उडाल्याचे चित्र आहे. यावर प्रतिक्रिया देताना, भाजपवाले महाविकास आघाडी आणि विशेषतः शिवसेनेवर राग काढत आहेत, असा मोठा दावा राष्ट्रवादीकडून करण्यात आला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते महेश तपासे यांनी यावर बोलताना भाजपवर टीका केली आहे. महाविकास आघाडीचे सरकार महाराष्ट्रात स्थापन झाले. तेव्हापासून वेगवेगळ्या विषयांवरुन सरकारला लक्ष्य करणे, सरकारमधील नेत्यांना लक्ष्य करणे, सरकार कसे कोसळेल, अस्थिरता कशी माजेल, लोकांमध्ये संभ्रम कसा निर्माण होईल याच्यासंदर्भात भाजपच्या अनेक नेत्यांकडून प्रयत्न केले जातात. काही जुने दाखले दिले जातात. सरकार स्थापन करता आले नाही म्हणून भाजप नेते महाविकास आघाडी आणि विशेषतः शिवसेनेवर राग काढत आहेत, असे तपासे यांनी म्हटले आहे.
भाजपाची ही तडफड असल्याचे लोकांच्या लक्षात येतेय
सर्वोच्च पदावर बसलेली व्यक्ती इतिहास तोडून मोडून सांगण्याचा प्रयत्न करतात. जनता आता भोळी राहिलेली नसून सत्ता मिळाली नाही म्हणून भाजपाची ही तडफड सुरू असल्याचे लोकांच्या लक्षात येत आहे. सत्ता मिळाली नाही याचाच राग शिवसेनेवर काढण्याचा उपक्रम भाजपाकडून सुरु असल्याचा आरोप तपासे यांनी केला आहे. हा कारवाईचा स्वयंघोषित सपाटा आहे की, राजकीय हेतूने प्रेरित आहे हा चर्चेचा विषय आहे. त्यावर भाजपचे काही प्रवक्ते व्याख्यान करतात, बातमी सांगतात, भविष्य सांगतात. उद्याच्या चार दिवसानंतर अमुक अमुक व्यक्तीवर छापा पडेल, अमुक अमुक व्यक्तीची काहीतरी देवाण-घेवाण आहे, या शब्दांत तपासे यांनी भाजप नेत्यांवर हल्लाबोल केला.
दरम्यान, माझा प्रश्न असा आहे इडी, सीबीआय, एनआय, लाचलुचपत प्रतिबंधक यंत्रणा, पोलीस या सर्व सरकारी यंत्रणांवर आमचा पूर्ण विश्वास आहे. पण एखादी व्यक्ती जो त्या यंत्रणेचा सदस्य नाही, त्याचा जनसंपर्क अधिकारी नाही, तो त्या यंत्रणेने ठेवलेला व्यक्ती नाही. तरी त्यांना या गोष्टी अगाऊ कशा कळतात, अशी विचारणा तपासे यांनी केली आहे.