Majid Memon: 'जे गुण नरेंद्र मोदींमध्ये, ते विरोधी नेत्यांमध्ये नाहीत', राष्ट्रवादीच्या नेत्याकडून पंतप्रधानांचे कौतुक
By ऑनलाइन लोकमत | Published: March 28, 2022 05:57 PM2022-03-28T17:57:23+5:302022-03-28T18:16:02+5:30
एकीकडे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते भाजप सरकारवर सातत्याने टीका करताना दिसतात, तर दुसरीकडे त्यांच्या पक्षातील नेते नरेंद्र मोदींचे कौतुक करत आहेत.
मुंबई: एकीकडे नवाब मलिक यांच्या अटकेनंतर राज्यातील सत्ताधारी महाविकास आघाडी सरकारमधील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे(NCP) नेते केंद्रातील भाजप सरकारवर सातत्याने टीका करताना दिसत आहेत. पण, आता याच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील एका नेत्याने पंतप्रधान नरेंद्र मोदींचे कौतुक केले आहे. राज्यसभेचे मजी खासदार माजीद मेमन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कौतुक केले आहे.
'मोदींमध्ये चांगले गुण असतील...'
माजीद मेमन यांनी ट्विट केले की, ''जे गुण पंतप्रधान नरेंद्र मोदींमध्ये आहेत, ते विरोधी पक्षातील नेत्यांमध्ये नाहीत. नरेंद्र मोदी जनतेची मते जिंकत असतील आणि त्यांना जगातील सर्वात लोकप्रिय नेता म्हणून ओळख मिळत असेल, तर त्यांच्यात नक्कीच चांगले गुण आणि त्यांची चांगली कामे असतील. विरोधी नेत्यांनाही हे जमत नाही,'' असे मेमन म्हणाले.
If Narendra Modi wins people’s mandare and is also shown as world’s most popular leader, there must be some qualities in him or good work he may have done which the opposition leaders are unable to find.
— Majeed Memon (@advmajeedmemon) March 27, 2022
केंद्र आणि राज्य सरकारमध्ये आरोप-प्रत्यारोप
नवाब मलिकांच्या अटकेनंतर भाजप आणि राज्यातील महाविकास आघाडी सरकार एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करताना दिसत आहेत. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही विधानसभेत बोलताना भाजपवर निशाणा साधला. ईडी भाजपचा नोकर झाला आहे का, असा प्रश्न त्यांनी केला. याशिवाय, नवाब मलिक आणि सरकारचा दाऊद इब्राहिमशी संबंध जोडल्याबद्दल आणि निवडणुकीत फरार माफियांच्या नावाचा फायदा घेतल्याबद्दलही तीव्र नाराजी व्यक्त केली.