"स्त्रीच्या भांगेत सिंदूर नसेल तर समजा प्लॉट रिकामा", धीरेंद्र शास्त्रींच्या विधानावरून आव्हाड संतापले
By ऑनलाइन लोकमत | Published: July 17, 2023 01:58 PM2023-07-17T13:58:05+5:302023-07-17T13:58:40+5:30
धीरेंद्र शास्त्री उर्फ बागेश्वर महाराज पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत.
Bageshwar Dham : बागेश्वर धाम येथील मठाधिपती धीरेंद्र शास्त्री (Dhirendra Shastri) उर्फ बागेश्वर महाराज (Bageshwar Maharaj) आपल्या विधानांमुळे नेहमीच चर्चेत असतात. नेहमी वादाच्या केंद्रस्थानी असलेले धीरेंद्र शास्त्री आता पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडले असून राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी त्यांच्यावर सडकून टीका केली आहे. धीरेंद्र शास्त्री यांनी एक वादग्रस्त विधान केले आहे, ज्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
"एखादी महिला विवाहित असेल, तर तिच्या दोन ओळखी असतात, भांगेत कुंकू आणि गळ्यात मंगळसूत्र. मात्र, भांगेत कुंकू नसेल आणि गळ्यात मंगळसूत्र नसेल, तर आम्ही लोक काय समजतो, की हा प्लॉट अजून रिकामा आहे", असे धीरेंद्र शास्त्री यांनी प्रवचन देताना म्हणताच वादाला तोंड फुटले. यावरून माजी मंत्री आणि आमदार जितेंद्र आव्हाड यांनी देखील ट्विटच्या माध्यमातून संताप व्यक्त केला.
शास्त्रींच्या विधानावरून आव्हाड संतापले
धीरेंद्र शास्त्री यांच्या विधानाचा समाचार घेताना जितेंद्र आव्हाडांनी म्हटले, "तो धीरेंद्र शास्त्री नावाचा बाबा म्हणतो "स्त्रीच्या गळ्यात मंगळसूत्र आणि भांगेत सिंदूर नसेल तर समजावं की हा 'प्लॉट' अजून रिकामा आहे." असलं घृणास्पद बोलणाऱ्यांची लोक भक्ती करतात? पतीच्या निधनानंतर मंगळसूत्र आणि कुंकू न लावणाऱ्या असंख्य दुर्दैवी भगिनी आपल्या समाजात आहेत. धीरेंद्रच्या मते ते 'रिकामे प्लॉट' असावे."
तो धीरेंद्र शास्त्री नावाचा बाबा म्हणतो "स्त्रीच्या गळ्यात मंगळसूत्र आणि भांगेत सिंदूर नसेल तर समजावं की हा 'प्लॉट' अजून रिकामा आहे." असलं घृणास्पद बोलणाऱ्यांची लोक भक्ती करतात?
— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) July 17, 2023
पतीच्या निधनानंतर मंगळसूत्र आणि कुंकू न लावणाऱ्या असंख्य दुर्दैवी भगिनी आपल्या समाजात आहेत.…
धीरेंद्र शास्त्रींनी आणखी सांगितले की, आपण एखाद्या महिलेकडे पाहिले अन् भांगेत कुंकू असेल, गळ्यात मंगळसूत्र असेल, तर आम्ही लोक दूरूनच पाहून समजून घेतो की, रडिस्ट्री झाली आहे. विशेष बाब म्हणजे या प्रवचनाला मोठ्या संख्येने महिला उपस्थित होत्या. व्हिडीओत दिसत आहे की, प्रवचन ऐकणाऱ्या अनेक महिला टाळ्या वाजवून त्यांच्या विधानाला प्रतिसाद देत आहेत. मात्र, सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेक महिला यावर संताप व्यक्त करत आहेत.