काल आपल्या शास्त्रज्ञांनी चंद्रावर झेप घेतली, आज भारतीय 'कुस्ती' मातीला मिळाली - आव्हाड
By ऑनलाइन लोकमत | Published: August 24, 2023 07:41 PM2023-08-24T19:41:22+5:302023-08-24T19:41:44+5:30
जागतिक कुस्ती फेडरेशननं भारतीय कुस्ती महासंघाची मान्यता रद्द केल्यानं राजकारण तापलं आहे.
जागतिक कुस्ती महासंघानं भारतीय कुस्ती महासंघाची मान्यता रद्द केल्यानं राजकारण तापलं आहे. विरोधकांनी सत्ताधारी भाजपावर टीका करताना खासदार ब्रीजभूषण शरण सिंह यांच्यावर ताशेरे ओढले आहेत. जागतिक कुस्ती महासंघाच्या या निर्णयामुळं भारतीय कुस्तीला मोठा धक्का बसला आहे. कारण आगामी काळात भारतीय शिलेदार आशियाई क्रीडा स्पर्धेत खेळणार आहेत. खरं तर जागतिक कुस्ती महासंघानं ३० मे रोजी भारतीय कुस्ती महासंघाला पत्र लिहून पूर्वसूचना दिली होती की, येत्या ४५ दिवसांत भारतीय कुस्ती महासंघाची निवडणूक न झाल्यास महासंघाच्या सदस्यत्वाला स्थगिती दिली जाईल.
देशातील नामांकित महिला कुस्तीपटूंनी भारतीय कुस्ती महासंघाचे तत्कालीन अध्यक्ष आणि विद्यमान खासदार ब्रीजभूषण सिंह यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. सिंह यांच्यावर झालेल्या लैंगिक शोषणाच्या आरोपानंतर क्रीडा मंत्रालयाने भारतीय कुस्ती महासंघाच्या पदाधिकाऱ्यांना निलंबित करून ADHOC समितीची स्थापना केली होती. पण, निवडणूक लांबल्याने आता भारतीय कुस्ती महासंघाची मान्यता रद्द करण्यात आली आहे. यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी सडकून टीका केली आहे.
"ब्रिजभूषण आणि त्याला संरक्षण देणाऱ्यांची पापं भोवली"
आव्हाड यांनी ब्रीजभूषण यांचा दाखला देत म्हटलं, "जागतिक कुस्ती फेडरेशनकडून भारतीय कुस्ती फेडरेशनची मान्यता रद्द. ब्रिजभूषण आणि त्याला संरक्षण देणाऱ्यांची पापं भोवली. काल आपल्या शास्त्रज्ञांनी चंद्रावर झेप घेतली, आज भारतीय कुस्ती मातीला मिळाली."
जागतिक कुस्ती फेडरेशन कडून भारतीय कुस्ती फेडरेशनची मान्यता रद्द. ब्रिजभूषण आणि त्याला संरक्षण देणाऱ्यांची पापं भोवली.
— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) August 24, 2023
काल आपल्या शास्त्रज्ञांनी चंद्रावर झेप घेतली, आज भारतीय कुस्ती मातीला मिळाली.https://t.co/VBVF6TjHSG
दरम्यान, जवळपास दीड महिने देशातील नामांकित पैलवान ब्रीजभूषण सिंह यांच्याविरोधात आखाड्याबाहेरील कुस्ती लढत होते. केंद्रीय क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर यांच्यासोबतच्या बैठकीनंतर पैलवानांनी आंदोलन मागं घेतलं होतं.