१६ वर्षांखालील मुलांचे क्लासेस बंद, कित्येक शिक्षकांवर गदा येईल, ही हुकूमशाही आहे - आव्हाड

By ऑनलाइन लोकमत | Published: January 19, 2024 12:44 PM2024-01-19T12:44:34+5:302024-01-19T12:45:02+5:30

नवीन मार्गदर्शक तत्वांनुसार १६ वर्षाखालील विद्यार्थ्यांना कोचिंग क्लासेसला जाता येणार नाही.

NCP MLA Jitendra Awad has criticized the decision to close classes for children below 16 years of age  | १६ वर्षांखालील मुलांचे क्लासेस बंद, कित्येक शिक्षकांवर गदा येईल, ही हुकूमशाही आहे - आव्हाड

१६ वर्षांखालील मुलांचे क्लासेस बंद, कित्येक शिक्षकांवर गदा येईल, ही हुकूमशाही आहे - आव्हाड

केंद्रीय शिक्षण मंत्रालयाच्या नवीन मार्गदर्शक तत्वांनुसार १६ वर्षाखालील विद्यार्थ्यांना कोचिंग क्लासेसला जाता येणार नाही. तसेच खासगी कोचिंग क्लासेसला कोणतेही आमिष दाखवून विद्यार्थ्यांसह पालकांना आकर्षित करता येणार नाही. या प्रकरणी दोषी आढळल्यास १ लाख रूपयांचा दंड ठोठावला जाणार आहे. केंद्रीय शिक्षण मंत्रालयाच्या नवीन मार्गदर्शक तत्त्वांत कोचिंग संस्थांना १६ वर्षांखालील विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यास मज्जाव करण्यात आला आहे. एवढेच नाही, तर त्यांना आता चांगले गुण किंवा रँकच्या हमीची आश्वासनेही देता येणार नाहीत. खासगी कोचिंग क्लासेसच्या बेफाम वाढीला आवर घालण्यास व नियमनासाठी एका कायदेशीर चौकटीची आवश्यकता होती. या पार्श्वभूमीवर मंत्रालयाने मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत.

दरम्यान, कोचिंग क्लासेसबद्दलच्या या निर्णयानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी सरकारवर ताशेरे ओढले. सोशल मीडियावर एक पोस्ट करत आव्हाड म्हणाले, "असे समजते की, १६ वर्षाच्या आतील कोणत्याही विद्यार्थ्याला यापुढे कोचिंग क्लासेसमध्ये जाता येणार नाही. कारण की, त्यावर बंदी घालण्यात आलेली आहे. तसेच कोणी कोचिंग क्लासेस घेतल्यास त्यांना १ लाख रूपयांचा दंड आकारण्यात येणार आहे. दहावीत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना कोचिंग क्लासेसमध्ये पाठवून त्यांचा चांगला अभ्यास करून घेण्याची पालक-शिक्षकांची मानसिकता असते. कोचिंग क्लासेस हे नोकरदार आई, वडील-पालकांनाही साह्यभूत ठरत आलेले आहेत."

तसेच सारासार विचार करता कोचिंग क्लासेसमुळे विद्यार्थ्यांच्या अभ्यासात प्रचंड सुधारणा होते. असे असताना १६ वर्षांखालील विद्यार्थ्यांना कोचिंग क्लासेस नाहीत, ही तर हुकूमशाही आहे. ज्यांना कोचिंग क्लासेसला जायचे असेल त्यांना जाऊ द्यावे. त्यांना थांबवता कशाला? या निर्णयाने किती शिक्षकांवर गदा येणार आहे, याचा अंदाजच न केलेला बरा. मध्यंतरी घरगुती ट्यूशन्स बंद केल्या होत्या. इथपर्यंत यांची मजल जाईल की म्हणतील, आता घरातच रहा, अशा शब्दांत आव्हाड यांनी सरकारवर टीकास्त्र सोडले.

काय आहेत मार्गदर्शक तत्त्वे?

  • पदवीधर असलेल्याच शिक्षकांची नियुक्ती करता येईल.
  • कोचिंग संस्था चांगले गुण वा रँकची आश्वासने देऊ शकत नाहीत.
  • १६ वर्षांखालील विद्यार्थ्याला प्रवेश देता येणार नाही. 
  • कोचिंग संस्थांमध्ये विद्यार्थ्यांची नोंदणी माध्यमिक शाळेच्या परीक्षेनंतरच केली जावी.
  • गुणवत्ता, सुविधा किंवा निकालांबद्दल कोणताही दावा करणारी जाहिरात स्वत: प्रकाशित करू शकत नाहीत
  • कोचिंग संस्थांना नैतिक अध:पतनाच्या गुन्ह्यात दोषी ठरविलेल्या व्यक्तींना शिक्षक किंवा अन्य पदांवर नियुक्ती करता येणार नाही.
  • विविध अभ्यासक्रमांचे शुल्क पारदर्शक आणि तर्कसंगत असावे, शुल्काच्या पावत्या देण्यात याव्यात. 
  • विद्यार्थ्याने मध्येच अभ्यासक्रम सोडल्यास उर्वरित कालावधीचे शुल्क परत करण्यात यावे.

Web Title: NCP MLA Jitendra Awad has criticized the decision to close classes for children below 16 years of age 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.