...तर मला राजदंड मतदारसंघात नेऊ द्या- जितेंद्र आव्हाड
By ऑनलाइन लोकमत | Published: November 20, 2018 03:21 PM2018-11-20T15:21:57+5:302018-11-20T15:26:10+5:30
जितेंद्र आव्हाड यांचं विधानसभा अध्यक्षांना पत्र
मुंबई: विधीमंडळातील राजदंड मला मतदारसंघात नेऊ द्या, अशी मागणी राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केली आहे. यासाठी त्यांनी विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांना पत्रदेखील लिहिलं आहे. राजदंड उचलल्यानंतरही विधीमंडळाचं कामकाज सुरू राहिल्यानं आव्हाड यांनी विधानसभा अध्यक्षांकडे राजदंड मतदारसंघात नेण्यास परवानगी देण्याची मागणी केली.
'विधानसभा अध्यक्ष विधीमंडळात असतात, तेव्हा राजदंड असतो. ते जेव्हा विधीमंडळात नसतात, तेव्हा राजदंड नसतो. ते प्रातिनिधीक सन्मानचिन्ह असतं. राजदंड उचलल्यावर सभागृह तहकूब व्हायला हवं. मात्र आज राजदंड उचलल्यावरही विधीमंडळाचं कामकाज सुरू होतं,' असं आव्हाड यांनी म्हटलं. 'राजदंड उचलून जर प्रथा-परंपरा तुडवण्यात येत असतील आणि राजदंड केवळ शोभेची वस्तू राहणार असेल, तर मला तो माझ्या मतदारसंघात नेऊ द्या,' अशी मागणी आव्हाड यांनी केली आहे. त्यासाठी त्यांनी विधानसभा अध्यक्षांना पत्रदेखील लिहिलं आहे.
विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाचा दुसरा दिवसदेखील आरक्षणाच्या मुद्यानं गाजला. मराठा, धनगर आरक्षणानंतर मुस्लिम आरक्षणावरुन मुस्लिम आमदार आक्रमक झाले. अबू आझमी, अब्दुल सत्तार, आसिफ शेफ, अमीन पटेल आणि अस्लम शेख हे आमदार एकत्र आले आणि त्यांनी विधानसभा अध्यक्षांसमोरील राजदंड पळवण्याचा प्रयत्न केला. आमदारांनी अध्यक्षांच्या दिशेनं कागदही भिरकावले. त्यामुळे विधानसभेत जोरदार गदारोळ झाला.