Nilesh Lanke: वन विभागात मोठा भ्रष्टाचार, सत्ताधारी आमदाराची सरकारकडे तक्रार
By ऑनलाइन लोकमत | Published: March 24, 2022 06:08 PM2022-03-24T18:08:58+5:302022-03-24T18:09:25+5:30
Nilesh Lanke: राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार निलेश लंके यांनी वन विभागातील भ्रष्टाचाराची तक्रार केली असून, यासंबंधित पुरावेदेखील सादर केले आहेत.
मुंबई: विधानसभेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पेनड्राइव्ह बॉम्बमुळे गाजत आहे. अशातच राष्ट्रवादी काँग्रेसचे पारनेरचे आमदार निलेश लंके यांनी आपल्या सरकारकडे वन विभागातील भ्रष्टाचाराची तक्रार केली आहे. यासंबंधित पुरावेदेखील त्यांनी सादर केले आहेत.
लंकेंचा उपोषणाचा इशारा
निलेश लंके यांनी आज विधानसभेत लक्षवेधी सूचनेद्वारे ही तक्रार केली आहे. त्यावर वन राज्यमंत्री दत्तात्रेय भारणे यांनी आठ दिवसांत चौकशीचा आदेश दिला आहे. मात्र, आठ दिवसांत कारवाई न झाल्यास वन मंत्र्यांच्या दालनात उपोषणाला बसण्याचा इशारा लंके यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना दिला आहे.
नेमकं काय प्रकरण आहे?
पारनेर तालुक्यात वन विभागाच्या वतीने करण्यात आलेल्या बंधाऱ्यांच्या कामासंबंधी लंके यांनी प्रथम मुख्यमंत्र्याकडे तक्रार केली होती. त्यासंबंधीचीच लक्षवेधी त्यांनी आज विधानसभेत मांडली. त्यांनी सांगितले की, सुमारे 1 कोटी 22 लाख रुपयांचा हा गैरव्यवहार झालेला आहे. वनविभागाने पारनेर तालुक्यात बांधलेल्या गॅबियन बंधाऱ्यांच्या कामात हा प्रकार झाल्याचा त्यांचा आरोप आहे.
पैसे वेगळीकडे वळवल्याचा आरोप
तालुक्यातील मातीनाल बांध व गॅबियन बंधार्यांची कामे करताना नियमानुसार निविदा प्रसिद्ध करणे गरजेचे होते. पण, तसे न करता सहाय्यक वनसंरक्षक रमेश देवखिळे तसेच अतिरिक्त कार्यभार असलेले वनक्षेत्रपाल प्रताप जगताप यांनी नियमांचे पालन केले नाही. मनमानी पद्धतीने कामांचे वाटप केले आहे. गॅबियन बंधारे ज्या मजुरांनी तयार केले, त्या मजुरांच्या नावावर मजुरी न देता वेगळ्याच मजुरांची नावे वापरुन बिले काढली, असा आरोप करत त्याची कागदपत्रे लंके यांनी सादर केली.