राष्ट्रवादीच्या निरंजन डावखरे यांचा आमदारकीचा राजीनामा, उद्या भाजपा प्रवेश करणार
By यदू जोशी | Published: May 23, 2018 11:40 AM2018-05-23T11:40:37+5:302018-05-23T14:51:58+5:30
कोकण पदवीधर मतदारसंघाचे आमदार अॅड. निरंजन डावखरे यांनी आमदारपदाबरोबरच राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या प्राथमिक सदस्यत्वाचाही आज राजीनामा दिला.
मुंबई- कोकण पदवीधर मतदारसंघाचे आमदार अॅड. निरंजन डावखरे यांनी आमदारपदाबरोबरच राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या प्राथमिक सदस्यत्वाचाही आज राजीनामा दिला. राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या स्थापनेपासून आपण वडिलांच्या माध्यमातून पक्षाची जडणघडण पाहिली होती. त्यामुळे पक्ष सोडताना दुःख होत आहे, असे नमूद करीत आमदार डावखरे यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसमधील स्थानिक पक्षांतर्गत राजकारणाला कंटाळून पक्षाबाहेर पडत असल्याचे स्पष्ट केले. आपली पुढील वाटचाल लवकरच जाहीर करणार असल्याचे डावखरेंनी नमूद केले. निरंजन डावखरे मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत उद्या भाजपामध्ये प्रवेश करणार आहेत.
विधान परिषदेचे सभापती रामराजे निंबाळकर यांच्याकडे आमदार डावखरे यांनी आमदारपदाचा राजीनामा आज सुपूर्द केला. तर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याकडे पक्षसदस्यत्वाचा राजीनामा पाठविला. भाजपचा बालेकिल्ला असलेल्या कोकण पदवीधर मतदारसंघात 2012 मध्ये झालेली निवडणूक अॅड. निरंजन डावखरे यांनी जिंकली होती. त्यानंतर त्यांनी सहा वर्षांच्या काळात शिक्षक, पदवीधर, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांबरोबरच कोकणातील विविध प्रश्न विधान परिषदेत मांडले होते. आमदारकीच्या पहिल्याच टर्ममध्ये अॅड. डावखरे यांनी कामकाजावर ठसा उमटविला होता.
राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या स्थापनेपासून पक्षात माझ्या वडिलांचा सहभाग होता. पक्षाची जडणघडण मी जवळून पाहिली होती. राष्ट्रवादी कॉंग्रेस ही मला कुटुंबाप्रमाणे होती. त्यामुळे पक्ष सोडताना मला दुःख होत आहे, असे आमदार डावखरे यांनी नमूद केले. राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या स्थानिक पातळीवरील एका गटाकडून सातत्याने डावखरे कुटुंबाविरोधात कारवाया सुरू होत्या. या गटाने 2016 मध्ये झालेल्या विधान परिषदेचे दिवंगत उपसभापती वसंत डावखरे यांच्या निवडणुकीतही पक्षविरोधी कारवाया केल्या. मात्र, त्यांच्याविरोधात काहीही कारवाई झाली नव्हती. आताही या गटाकडून आपल्याला सातत्याने स्थानिक स्तरावर डावलले जात होते. अखेर या स्थानिक पक्षांतर्गत राजकारणाला कंटाळून आपण राष्ट्रवादी कॉंग्रेसबाहेर पडण्याचा निर्णय घेतला, असे आमदार अॅड. निरंजन डावखरे यांनी स्पष्ट केले. यापुढील वाटचाल आपण लवकरच जाहीर करू, असेही आमदार डावखरे यांनी नमूद केले.