…जेव्हा राष्ट्रवादीचा आमदार पंकजा मुंडेंवर भर कार्यक्रमात स्तुतिसुमने उधळतो
By ऑनलाइन लोकमत | Published: August 21, 2019 02:35 PM2019-08-21T14:35:36+5:302019-08-21T14:47:54+5:30
मी आजपर्यंत जे काम त्यांच्याकडे घेऊन गेलो, ते कधीच अडले नाही.
मुंबई - विधानसभा निवडणुका अवघ्या दोन महिन्यांवर येऊन ठेपल्या आहेत. त्यामुळे सत्ताधारी आणि विरोधक यांच्यातील आरोप-प्रत्यारोप सुरू असल्याचे पहायला मिळत आहे. मात्र असे असताना जालना जिल्ह्यातील घनसावंगी विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादीचे विद्यामान आमदार राजेश टोपे यांनी एका कार्यक्रमात ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांच्यावर स्तुतिसुमने उधळल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. मंगळवारी अंबड तालुक्यातील रामगव्हाण येथे ते बोलत होते.
पंकजा मुंडे यांनी माझ्या मतदारसंघात त्यांच्या खात्यातून कोट्यावधी रुपयांचा निधी दिला आहे. मी आजपर्यंत जे काम त्यांच्याकडे घेऊन गेलो, ते कधीच अडले नाही. पंकजा ताई माझ्या भगनी असल्याचे राजेश टोपे म्हणाले. विरोधी पक्षात असलेले टोपे हे सत्ताधारी पक्षात मंत्री असलेल्या पंकजा मुंडेंचे गुणगान गात असल्याचे पाहून काही वेळेसाठी उपस्थित गावकरी सुद्धा आश्चर्यचकित झाले होते.
स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांच्याशी सुद्धा आपले चांगले संबध होते. मला ज्यावेळी अडचण आली तर ते मार्गदर्शन करायचे. त्याचप्रमाणे पंकजा मुंडे ह्या सुद्धा माझ्या मतदारसंघातील कोणतेही काम थांबवत नसल्याचे सुद्धा टोपे म्हणाले.
विधानसभा निवडणुका तोंडावर आहे. त्यामुळे सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर टीका करण्याची कोणतेही संधी सोडत नसताना दिसत आहे. तर भर कार्यक्रमात एखांदा विरोधी पक्षाचा आमदार सत्ताधारी मंत्राच्या कामाचे गुणगान गात असल्याचे कुणाला विश्वास बसणार नाही. मात्र प्रत्यक्षात असे घडलं आहे. त्यामुळे टोपेंच्या मतदारसंघात दिवसभर याची चर्चा सुरू असल्याचे पहायला मिळाले.