रोहित पवारांची राष्ट्रवादीच्या शिबिराला अनुपस्थिती; तर्क-वितर्कांना उधाण येताच खुलासा, म्हणाले...
By ऑनलाइन लोकमत | Published: January 3, 2024 02:32 PM2024-01-03T14:32:52+5:302024-01-03T14:33:42+5:30
महाराष्ट्राच्या हितासाठी एकजुटीने लढू आणि जिंकू, असा विश्वासही रोहित पवारांनी व्यक्त केला आहे.
NCP Rohit Pawar ( Marathi news ) : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत शिर्डी येथे "ज्योत निष्ठेची- लोकशाहीच्या संरक्षणाची" अंतर्गत राष्ट्रवादीच्या दोन दिवसीय शिबिराला आज सुरुवात झाली आहे. अजित पवार यांच्या बंडानंतर राष्ट्रवादीत पडलेल्या फुटीनंतर होत असलेल्या या शिबिराला महत्त्व प्राप्त झालं आहे. मात्र या शिबिरात राष्ट्रवादीचे युवा नेते आणि आमदार रोहित पवार अनुपस्थित राहिल्याने तर्क-वितर्क लढवले जात होते. या पार्श्वभूमीवर रोहित पवार यांनी 'एक्स'वर पोस्ट लिहीत खुलासा केला आहे.
शिबिरातील अनुपस्थितीचं कारण सांगताना रोहित पवारांनी म्हटलं आहे की, "पूर्वनियोजित कार्यक्रमामुळे मी बाहेर असल्याने शिर्डीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शिबिराला उपस्थित राहू शकलो नाही आणि याबाबत पक्ष श्रेष्ठींसोबत चर्चाही झाली आहे. याचा कुणीही राजकीय गैरअर्थ काढू नये," असं आवाहन रोहित पवारांनी केलं आहे. तसंच "आम्ही सर्वजण सोबत असून आदरणीय शरद पवार आणि प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्राच्या हितासाठी एकजुटीने लढू आणि जिंकू," असा विश्वासही रोहित पवारांनी व्यक्त केला आहे.
पूर्वनियोजित कार्यक्रमामुळे मी बाहेर असल्याने शिर्डीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शिबिराला उपस्थित राहू शकलो नाही आणि याबाबत पक्ष श्रेष्ठींसोबत चर्चाही झाली आहे.
— Rohit Pawar (@RRPSpeaks) January 3, 2024
याचा कुणीही राजकीय गैरअर्थ काढू नये..
आम्ही सर्वजण सोबत असून आदरणीय @PawarSpeaks साहेब आणि प्रदेशाध्यक्ष मा.…
राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या शिबिराला कोणा-कोणाची हजेरी?
या शिबिराला शरद पवार यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय कार्याध्यक्षा आणि खासदार सुप्रिया सुळे, जयंत पाटील, पक्षाचे राष्ट्रीय कोषाध्यक्ष हेमंत टकले, राज्यसभा खासदार फौजिया खान, आमदार अनिल देशमुख, आमदार अशोक पवार, आमदार बाळासाहेब पाटील, आमदार अरुण लाड, आमदार संदीप क्षीरसागर, प्रदेश सरचिटणीस बसवराज पाटील, महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे आणि इतर प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित आहेत.
शिबिरात जयंत पाटील काय म्हणाले?
राष्ट्रवादीच्या शिबिरात पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी म्हटलं आहे की, "आज सावित्रीबाई फुले यांची जयंती आहे, हा एक विलक्षण योगायोग आहे. ज्या पवार साहेबांनी महाराष्ट्रात महिलांना पन्नास टक्के राज्यव्यवस्थेत वाटा देण्यापर्यंत आणि देशाच्या संरक्षण दलात काम करण्याची संधी देण्यापर्यंतचं काम केलं त्या पवार साहेबांच्या पक्षाची सावित्रीबाईंच्या जयंती निमित्ताने समतेचा विचार हा राज्यात व देशात टिकावा यासाठी सुरू केलेल्या या शिबिराची ज्योत मला खात्री आहे की, महाराष्ट्रातल्या प्रत्येक सर्वसामान्य माणसापर्यंत पोहोचवण्याचं काम तुम्ही आम्ही सर्वजण करू. सावित्रीबाईंवर शेण गोळ्यांच्या मारा झाला पण ते आपल्या ध्येयापासून मागे हटले नाहीत. संघर्ष करण्याचा काळ होता त्यांनी संघर्ष केला. आगामी काळात आपल्यासमोर देखील संघर्ष उभा राहिलेला आहे, येणाऱ्या निवडणुकीचे वर्ष म्हणजेच संघर्षाचे वर्ष असते. २०२४ हा निवडणुकीचा काळ होणार आहे, या काळात आपण सर्वजण वैचारिक संघर्ष करण्यासाठी ठामपणाने भविष्यकाळात काम करण्याची गरज आहे," असं जयंत पाटील म्हणाले.