भाजपाच्या उपटसुंभांचा 'छंद' आपल्याला दिसत नाही का?; रोहित पवार अन् दरेकरांमध्ये जुंपली!

By ऑनलाइन लोकमत | Published: May 19, 2022 11:57 AM2022-05-19T11:57:03+5:302022-05-19T11:58:09+5:30

राज्याचे विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर आणि राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांच्यात आरोप प्रत्योराप सुरू आहेत.

ncp mla rohit pawar criticism on bjp leader pravin darekar | भाजपाच्या उपटसुंभांचा 'छंद' आपल्याला दिसत नाही का?; रोहित पवार अन् दरेकरांमध्ये जुंपली!

भाजपाच्या उपटसुंभांचा 'छंद' आपल्याला दिसत नाही का?; रोहित पवार अन् दरेकरांमध्ये जुंपली!

Next

मुंबई-

राज्याचे विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर आणि राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांच्यात आरोप प्रत्योराप सुरू आहेत. चंद्रकांतदादांवर टीका करण्याइतके रोहित पवार मोठे झालेले नसल्याचं वक्तव्य दरेकर यांनी केलं होतं. त्यावर आज रोहित पवार यांनी शेकल्या शब्दांत दरेकरांनाच सवाल विचारला आहे. "पवार साहेबांच्या राजकीय कारकिर्दीएवढंही वय नसलेल्या भाजपातील काही उपटसुंभांचा साहेब व इतर नेत्यांविषयी खालच्या पातळीवरची भाषा वापरण्याचा 'छंद' आपल्याला दिसत नाही का?", असा सवाल रोहित पवार यांनी उपस्थित केला आहे. 

"दरेकर साहेब वयाचा विचार करायचा तर आदरणीय पवार साहेबांच्या राजकीय कारकिर्दीएवढंही वय नसलेल्या भाजपातील काही उपटसुंभांचा साहेब व इतर नेत्यांविषयी खालच्या पातळीवरची भाषा वापरण्याचा 'छंद' आपल्याला दिसत नाही का? अशांना महत्त्व देत नाही, पण ते गरळ ओकताना भाजपचे मोठे नेते का गप्प बसतात?", असा खरमरीत सवाल उपस्थित करत रोहित पवार यांनी दरेकरांना उत्तर दिलं आहे. 

"मोठ्या नेत्यांना सल्ला देणं/त्यांच्यावर हल्ला करण्याएवढा मी मोठा नसल्याची मला जाणीव आहे. पण राज्यातील तुमच्या पक्षातील मोठ्या नेत्यांकडून राजकीय समंजसपणाची अपेक्षा करणं काही गैर नाही. कारण मोठे नेतेच चुकीचं वागले तर त्याचं अनुकरण लहानही करत असतात", असंही रोहित पवार यांनी ट्विट केलं आहे. त्यापुढे जात रोहित पवारांनी राजकीय संस्कृती जपण्याचाही सल्ला दरेकरांना देऊ केला आहे. "हेच मोठे नेते चुकीचं समर्थन करत असतील तर महाराष्ट्रात आजवरच्या नेत्यांनी निर्माण केलेल्या सुसंस्कृत राजकारणाच्या परंपरेला तडा जाण्याचीही भीती वाटते. महाराष्ट्राप्रमाणे देशात इतरत्र कुठंही दिसत नसलेली ही राजकीय संस्कृती खरंतर आपण सर्वांनीच जपायला हवी", असं रोहित पवार यांनी म्हटलं आहे. 

दरेकर नेमकं काय म्हणाले होते?
"रोहित पवार अजून लहान आहेत. चंद्रकांतदादांवर वार करायला मोठे पवार आहेत. त्यानंतर अजित पवार आहेत. त्यामुळे त्यांनी इतक्यात प्रदेशाध्यक्षांवर टीका करण्याची किंबहुना सल्ला देण्याची घाई करू नये. रोहित पवार हल्ली आपल्या क्षमतेपेक्षा जास्त मोठ्या नेत्यांवर टीका-टिप्पणी करुन बुजूर्गपणाचा आव आणण्याचा त्यांचा प्रयत्न आहे", असं प्रवीण दरेकर म्हणाले होते. 

Web Title: ncp mla rohit pawar criticism on bjp leader pravin darekar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.