'लग्न ठरवायच्या बैठकीतच जर एवढी भांडणं झाली तर पुढे संसार कसा नीट होणार?'

By ऑनलाइन लोकमत | Published: November 4, 2019 07:57 AM2019-11-04T07:57:56+5:302019-11-04T09:44:23+5:30

या वादाची दुसरी बाजू म्हणजे सरकार स्थापन करताना या दोन पक्षात असलेले मतभेद बघता पुढच्या पाच वर्षात खरंच भाजप-शिवसेना राज्याला एक स्थिर सरकार देऊ शकतील का?

NCP MLA Rohit Pawar Criticized Shiv Sena BJP Yuti on Power Disputes | 'लग्न ठरवायच्या बैठकीतच जर एवढी भांडणं झाली तर पुढे संसार कसा नीट होणार?'

'लग्न ठरवायच्या बैठकीतच जर एवढी भांडणं झाली तर पुढे संसार कसा नीट होणार?'

Next

मुंबई - विधानसभा निवडणुकांचे निकाल लागून एक आठवडा सरला तरी राज्यातील सत्तास्थापनेचा तिढा सुटताना पाहायला मिळत नाही. शिवसेना-भाजपा युतीला बहुमत आहे मात्र मुख्यमंत्रीपदावरुन शिवसेनेने भाजपाला कोंडीत पकडायला सुरुवात केली आहे. शिवसेनेने मनात आणलं तर बहुमत सिद्ध करु शकते असा दावा संजय राऊत यांनी केला आहे. तर भाजपानेही आले तर सोबत अन्यथा एकला चलो रे भूमिका घेतल्याचं दिसत आहे. या दोन्ही पक्षांच्या कुरघोडीमुळे अद्यापही राज्यात नवीन सरकार स्थापन होऊ शकलं नाही. त्यामुळे विरोधकांकडून युतीला निशाणा बनविण्यात येत आहे. 

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी सत्ता स्थापनेवरुन चाललेल्या नाट्यावर भाष्य करताना सांगितले आहे की, महाराष्ट्राला असे अनेक नेते लाभले आहेत ज्यांच्याबद्दल संपूर्ण राज्याला नेहमीच आदर राहिला, स्व. बाळासाहेब ठाकरे त्यापैकीच एक. माझ्या मनात बाळासाहेब ठाकरेंच्या बद्दल आदर असण्याची अनेक कारणे आहेत त्यापैकी एक म्हणजे देशाच्या राजकारणात त्यांचं असलेलं वजन. निवडणूकीपूर्वी युती करताना सत्तेतला वाटा समान असेल असा शब्द शिवसेनेला देऊन देखील सध्या भाजप ज्याप्रकारे आपला शब्द फिरवत आहे हे बघता प्रश्न पडतो की आज जर स्व. बाळासाहेब ठाकरे हयात असते तर भाजपचं एवढं धाडस झालं असत का ? असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. 

तसेच राज्याचा एक नागरिक म्हणून सरकार स्थापनेला होत असणारा उशीर मला चिंताग्रस्त करत आहे. राज्यातील शेतकरी दुष्काळाच्या तडाख्यातून सावरायच्या आधीच त्याला अतिवृष्टीचा फटका बसला आहे. ग्रामीण तसेच शहरी भागातील जनतेला अनेक समस्या भेडसावत आहेत. लवकरात लवकर सरकार स्थापन करून सर्वांनी मिळून जनतेला आधार देण्याची गरज आहे. राज्यातील जनतेने आमच्या आघाडीला विरोधात बसण्याचा कौल दिला , आम्ही त्याचा स्वीकार करून कामाला देखील लागलो आहे मात्र भाजप-शिवसेना युतीमध्ये सध्या सुरू असणारा वाद हा लोकशाहीचा अपमान करणारा आहे असा आरोप रोहित पवार यांनी शिवसेना-भाजपावर केला आहे. 

दरम्यान, या वादाची दुसरी बाजू म्हणजे सरकार स्थापन करताना या दोन पक्षात असलेले मतभेद बघता पुढच्या पाच वर्षात खरंच भाजप-शिवसेना राज्याला एक स्थिर सरकार देऊ शकतील का? यापूर्वी देखील एकत्र सत्तेत असताना युतीमध्ये होणारा वाद सगळ्या राज्याने बघितला आहे. आतादेखील संख्याबळाच्या जोरावर भाजप ज्याप्रकारे शिवसेनेला अडचणीत आणायचा प्रयत्न करत आहे , त्यातून नवीन वाद उद्भवून पुन्हा एकदा राज्यातील जनतेच्या नशिबात सत्ताधारी पक्षांची भांडणेच बघायची आहेत अस दिसतंय. कारण लग्न ठरवायच्या बैठकीतच जर एवढी भांडणं झाली तर पुढं जाऊन संसार कसा नीट होणार? असा सवालही रोहित पवारांनी उपस्थित केला आहे. 

Web Title: NCP MLA Rohit Pawar Criticized Shiv Sena BJP Yuti on Power Disputes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.