भाजपासोबत जायचं का?; शेतकऱ्यांच्या सभेत आमदार रोहित पवारांनी विचारला सवाल

By ऑनलाइन लोकमत | Published: March 11, 2024 12:57 PM2024-03-11T12:57:45+5:302024-03-11T12:59:29+5:30

अनेक कारवाया, अनेक अडचणी आणल्या जातील. माझ्या कुटुंबालाही अडचणीत आणलं जातंय. माझी पत्नी टेन्शनमध्ये असते, आई वडील चिंतेत असतात असं रोहित पवारांनी सांगितले.

NCP MLA Rohit Pawar criticizes BJP over ED Action on his Sugar Factory | भाजपासोबत जायचं का?; शेतकऱ्यांच्या सभेत आमदार रोहित पवारांनी विचारला सवाल

भाजपासोबत जायचं का?; शेतकऱ्यांच्या सभेत आमदार रोहित पवारांनी विचारला सवाल

छत्रपती संभाजीनगर - Rohit Pawar on BJP ( Marathi News ) आज लढण्याची वेळ आहे. जेव्हा कुणी कारखाना खरेदी करायला तयार नव्हते तेव्हा आम्ही शेतकऱ्यांसाठी इथं आलो, जमिनीसाठी कारखाना खरेदी केला नाही. आजपर्यंत एकही इंच जमीन विकली नाही. आज कारखाना बंद करता, मग ज्यांचे पोट या कारखान्यावर आहे त्यांचा तुम्ही काय विचार केलात?, आम्ही विरोधात बोलतो म्हणून कारवाई करता. हा नातू आजोबासोबत राहत असेल तर काय चुकले? जे गेलेत ते कशासाठी गेलेत माहिती नाही का? आम्ही लढण्याची भूमिका घेतली. ही भूमिका चुकीची घेतली का? स्वहितासाठी माझी कंपनी सुखरुप राहावी. त्यासाठी लोकांना सोडून मी भाजपासोबत गेलं पाहिजे का? भाजपासोबत जायचं का? असा सवाल आमदार रोहित पवारांनी शेतकऱ्यांना केला. 

कन्नड साखर कारखान्यावर झालेल्या कारवाईनंतर रोहित पवारांनी शेतकऱ्यांची सभा घेतली. त्यातून भाजपावर जोरदार निशाणा साधला. रोहित पवारांच्या प्रश्नावर शेतकऱ्यांनी नाही, नाही अशी घोषणा दिली. त्यावर आम्ही तुमचचं ऐकतोय, भाजपासोबत जात नाही असं स्पष्ट केले. रोहित पवार म्हणाले की, आम्ही लढायला तयार आहोत. पण ही आसुरी शक्ती जी आवाज दाबण्याचा प्रयत्न करतेय, महाराष्ट्राची अस्मिता अडचणीत आणण्याचा प्रयत्न करतंय त्याचा तुम्ही विरोध करणार का? आपल्या कारखान्यासाठी आपल्याला लढायचंय. ही प्रचारसभा नाही. शेतकऱ्यांसोबत चर्चा करण्यासाठी मी इथं आलोय. तुम्ही इतक्या मोठ्या संख्येने इथं येऊन मला ताकद दिली असं त्यांनी सांगितले. 

तसेच मराठवाड्यातील शेतकऱ्यांनी कायम संघर्ष केलाय. त्यासमोर आमचा संघर्ष लहान आहे. संघर्ष करण्याची भूमिका महाराष्ट्रातील प्रत्येक व्यक्तीची आहे. अनेक कारवाया, अनेक अडचणी आणल्या जातील. माझ्या कुटुंबालाही अडचणीत आणलं जातंय. माझी पत्नी टेन्शनमध्ये असते, आई वडील चिंतेत असतात. पण काहीही झालं तरी वाकायचं नाही ही शिकवण माझ्यावर आहे. सरकारविरोधात बोलतोय, मोठ्या लोकांना अंगावर घेतोय. जर आज आम्ही बोललो नाही तर लोकांची भूमिका कोण घेणार, उद्या जर मला जेलमध्ये टाकले तर माझं कुटुंब वाऱ्यावर येईल. पण कितीही झाले तरी विचारांपासून हटणार नाही. शेवटपर्यंत मी लढत राहणार, महाराष्ट्राच्या अस्मितेसाठी झटत राहणार आहे असंही रोहित पवारांनी म्हटलं. 

शेतकऱ्यांनी दाखवले रोहित पवारांना काळे झेंडे

दरम्यान, या भाषणावेळी काही शेतकऱ्यांनी रोहित पवारांना काळे झेंडे दाखवले. तेव्हा ईडीच्या माध्यमातून सरकारकडून कारवाई केली जातेय. कारखान्यावर जप्ती आणली गेली. कारवाई करणाऱ्यांना वाटलं आम्ही सर्व घाबरून जाऊ. जे घाबरणारे, पळणारे होते ते तुमच्यासोबत आहे. आम्ही लढणारे आणि घाबरणारे लोक नाही. सरकारमधील काही नेत्यांचा कार्यक्रम झाला पण साधा काळा रुमाल असला तरी काढला गेला. मात्र ही सभा सर्वसामान्य शेतकऱ्यांची आहे. ज्यांनी काळे झेंडे दाखवले त्यांनी बाजूला येऊन माझ्याशी चर्चा करावी. पोलिसांनी त्यांच्यावर कारवाई करू नये असं रोहित पवारांनी सांगितले. 
 

 

Web Title: NCP MLA Rohit Pawar criticizes BJP over ED Action on his Sugar Factory

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.