Rohit Pawar: "फडणवीसांची कार्यशैली भारावणारी...", रोहित पवारांनी केलं उपमुख्यमंत्र्यांचं कौतुक!
By ऑनलाइन लोकमत | Published: August 11, 2022 07:32 PM2022-08-11T19:32:48+5:302022-08-11T19:32:48+5:30
राजकारणात कधीच कुणी कुणाचा शत्रु नसतो नसं म्हणतात. लोकप्रतिनिधींना आपल्या मतदार संघातील कामं करुन घेण्यासाठी सर्वपक्षीय नेत्यांशी आणि खास करुन विरोधी पक्षातील आमदारांना सत्ताधाऱ्यांशी चांगले संबंध ठेवावेच लागतात.
मुंबई-
राजकारणात कधीच कुणी कुणाचा शत्रु नसतो नसं म्हणतात. लोकप्रतिनिधींना आपल्या मतदार संघातील कामं करुन घेण्यासाठी सर्वपक्षीय नेत्यांशी आणि खास करुन विरोधी पक्षातील आमदारांना सत्ताधाऱ्यांशी चांगले संबंध ठेवावेच लागतात. राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपा कट्टर विरोधी असले तरी काही राजकीय पटलावर हे दोन्ही पक्ष कधी एकत्र येतील याचाही काही नेम नाही. त्यात नुकतंच राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्याची माहिती समोर आली. मतदार संघातील काही कामांसाठी ही भेट झाल्याचं सांगण्यात आलं.
धनंजय मुंडे यांच्या फडणवीस भेटीचं उदाहरण ताजं असतानाच आज राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे नातू आणि कर्जत-जामखेडचे आमदार रोहित पवार यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं कौतुक करणारी फेसबुक पोस्ट केली आहे. रोहित पवार यांनी एमपीएससीशी निगडीत एका प्रश्ना संदर्भात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन दिलं होतं. फडणवीसांनी रोहित पवारांच्या निवेदनाची दखल घेतली. याच बाबत रोहित पवार यांनी फडणवीसांचे आभार मानले आहेत. पण आभार व्यक्त करतानाच रोहित पवार यांनी फडणवीसांच्या कामाच्या वेगाची तुलना थेट राष्ट्रवादीचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी केली आहे.
काय म्हणाले रोहित पवार?
रोहित पवार यांनी आपल्या फेसबुक पेजवर एक पोस्ट केली आहे. यात त्यांनी MPSC च्या कक्षेबाहेरील सर्व जागा दुय्यम सेवा मंडळामार्फत न भरता एमपीएससी मार्फतच भरल्या जाव्यात या मागणीसाठी रोहित पवारांनी फडणवीसांची भेट घेतली. "MPSC च्या कक्षेबाहेरीलही सर्व जागा दुय्यम सेवा मंडळामार्फत न भरता MPSC मार्फतच भराव्यात यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांना पत्र दिलं. फडणवीस साहेबांशी वैचारिक मतभेद असले तरी त्यांची कार्यशैली अजितदादांसारखीच भारावणारी असल्याची बाब त्यांच्याशी चर्चा करताना ठळकपणे जाणवते", असं रोहित पवार यांनी पोस्टमध्ये म्हटलं आहे.