रोहित पवार अपघातग्रस्तांच्या मदतीला धावले, स्वत: धक्का मारत अपघातग्रस्त कार काढली बाहेर
By मोरेश्वर येरम | Published: November 19, 2020 01:06 PM2020-11-19T13:06:15+5:302020-11-19T13:11:01+5:30
रोहित यांनी तात्काळ धाव घेत रस्त्याच्या खाली गेलेली अपघातग्रस्त कार आपल्या सहकाऱ्यांच्या मदतीने बाहेर काढली.
सांगली
राष्ट्रवादीचे युवा आमदार रोहित पवार यांनी सामाजिक भान राखत अपघातग्रस्तांना केलेल्या मदतीमुळे ते पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. रोहित पवार यांच्या सतर्कतेमुळे अपघातग्रस्तांना तात्काळ मदत मिळाली आहे. सोशल मीडियावर रोहित पवारांच्या या कामाचं कौतुक केलं जात आहे.
सांगलीतील मांडवे-पिंगळी दरम्यान एका शेतकऱ्याच्या कारला अपघात झाला. रोहित पवारही त्याचवेळी या परिसरातून जात होते. रोहित यांनी तात्काळ धाव घेत रस्त्याच्या खाली गेलेली अपघातग्रस्त कार आपल्या सहकाऱ्यांच्या मदतीने बाहेर काढली. त्यानंतर जखमींना तातडीने उपचारासाठी नजिकच्या रुग्णालयात पाठविण्यात आले. अपघातग्रस्तांसाठी रोहित पवार देवदूत ठरले. सुदैवाने यात कोणतीही जीवीतहानी झाली नाही.
पोलिस चौकशीला घाबरुन अनेकदा लोक अपघातग्रस्तांना मदत करत नाहीत आणि त्यामुळं वेळीच मदत न मिळाल्याने अपघातातील जखमींचा जीव जाऊ शकतो.
— Rohit Pawar (@RRPSpeaks) November 18, 2020
त्यामुळं माझं आवाहन आहे, कोणतीही भीती न बाळगता अपघातग्रस्तांना तातडीने मदत करा आणि पोलिसांनाही विनंती आहे, अशा लोकांना चौकशीसाठी त्रास देऊ नये. https://t.co/csgQEhK8UW
रोहित पवार अपघातग्रस्त कारला धक्का मारुन बाहेर काढत असतानाचे फोटो व्हायरल झाले. त्यानंतर स्वत: रोहित पवार यांनी घटनेची माहिती देत अशाप्रकारच्या अपघातांसाठी स्वत:हून पुढे येऊन मदत करणं हे प्रत्येकाचं कर्तव्य असल्याचं म्हटलं. 'पोलीस चौकशीला घाबरुन अनेकदा लोक अपघातग्रस्तांना मदत करत नाहीत आणि त्यामुळे वेळीच मदत न मिळाल्याने अपघातातील जखमींचा जीव जाऊ शकतो. त्यामुळे कोणतीही भीती न बाळगता अपघातग्रस्तांना तातडीने मदत केली पाहिजे', असं रोहित पवार यांनी म्हटलं आहे.