अदृश्य शक्ती दबावतंत्राचा वापर करून...; रोहित पवारांचा सरकारवर गंभीर आरोप

By ऑनलाइन लोकमत | Published: November 29, 2023 05:11 PM2023-11-29T17:11:26+5:302023-11-29T17:12:31+5:30

युवा संघर्ष यात्रा विदर्भात पोहोचल्यानंतर रोहित पवार यांनी अप्रत्यक्षपणे राज्य सरकारवर गंभीर आरोप केला आहे.

ncp mla Rohit Pawars serious allegations against the state government | अदृश्य शक्ती दबावतंत्राचा वापर करून...; रोहित पवारांचा सरकारवर गंभीर आरोप

अदृश्य शक्ती दबावतंत्राचा वापर करून...; रोहित पवारांचा सरकारवर गंभीर आरोप

मुंबई : राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार हे युवा संघर्ष यात्रेच्या माध्यमातून सध्या राज्यभर फिरत आहे. पुण्यातून सुरू झालेली ही यात्रा सध्या विदर्भात पोहोचली आहे. या यात्रेच्या माध्यमातून तरुणांशी संवाद साधत रोहित पवारांकडून राज्य सरकावर टीकास्त्र सोडलं जात आहे. ही यात्रा सुरू असतानाच रोहित पवार यांनी गंभीर आरोप करत सरकारवर पुन्हा हल्लाबोल केला आहे. दबावतंत्राचा वापर करून माझे सोशल मीडिया अकाउंट बंद करण्याचा घाट घातला जात असल्याचा दावा रोहित पवारांनी केला आहे.

रोहित पवार यांनी 'एक्स'वर लिहिलेल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे की, "युवा संघर्ष यात्रेच्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नांना आवाज दिला असल्याने तसेच युवा संघर्ष यात्रेला मिळता प्रतिसाद बघता काही अदृश्य शक्तींकडून खोट्या तक्रारींचा सपाटा लावून, तसेच दबावतंत्राचा वापर करून माझे सोशल मीडिया अकाउंट बंद करण्याचा घाट घातला जात आहे," असा आरोप रोहित पवारांनी केला आहे. तसंच अशा अदृश्य शक्तींना एक सांगू इच्छितो की, तुम्ही कितीही ताकद लावा आम्ही लोकांचा आवाज बुलंद करतच राहू, असंही त्यांनी म्हटलं आहे.

रोहित पवारांची आणखी एक पोस्ट चर्चेत

रोहित पवार यांनी काल मराठेशाहीचा उल्लेख करत लिहिलेल्या एका पोस्टची राजकीय वर्तुळात मोठ्या प्रमाणात चर्चा झाली. या पोस्टमध्ये रोहित पवारांनी लिहिलं होतं की, "युवा संघर्ष यात्रेत साडेचारशे किमी पायी चालल्यानंतर एक गोष्ट जाणवली ती म्हणजे पूर्वीच्या काळात मराठेशाही एका 'अनाजी पंत'ने संपवली. आताच्या काळामध्ये 'महाराष्ट्र धर्म' संपवण्याचे काम एक आधुनिक 'अनाजी पंत' करत आहेत." 

रोहित पवारांच्या या पोस्टनंतर भाजपचे नेते आक्रमक झाले असून भाजपचे विधानपरिषद आमदार गोपीचंद पडळकर यांनी रोहित पवारांवर पलटवार केला. "रोहित पवार, तुमच्या माहिती करता...स्वराज्याची स्थापना आठरापगड जातींनी केली. पण त्यावर घाव घालणारे सूर्याजी पिसाळ आणि गणोजी शिर्के होते आणि देवेंद्र फडणवीस यांनी गरीब मराठा समाजाला दिलेले आरक्षण घालवणारे आपले जातीयवादी आजोबा शरद पवार हेच आहेत," असा घणाघात पडळकर यांनी केला. 

दरम्यान, दसऱ्याच्या मुहूर्तावर पुण्यावरून निघालेली रोहित पवार यांची युवा संघर्ष यात्रा येत्या १२ डिसेंबरला नागपूरला धडकणार आहे.
 

Web Title: ncp mla Rohit Pawars serious allegations against the state government

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.