Amol Mitkari: "हा ड्रामा आणि हे ड्रामेबाज म्हणजे महाराष्ट्रात साचलेली घाण", अमोल मिटकरींचे टीकास्त्र
By ऑनलाइन लोकमत | Published: March 27, 2022 07:31 PM2022-03-27T19:31:33+5:302022-03-27T19:31:45+5:30
Amol Mitkari: राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी गोपीचंद पडळकर, सदाभाऊ खोत आणि किरीट सोमय्या यांच्यावर टीका केली आहे.
मुंबई: काल अनिल परबांविरोधात भाजप नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी दापोलीत आंदोलन केले. त्यानंतर आज सांगलीत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्याच्या लोकार्पण सोहळ्यावरुन गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) आणि सदाभाऊ खोत (Sadabhau Khot) यांचे आंदोलन झाले. या दोन्ही आंदोलनावर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनी टीका केली आहे.
काल किरीट सोमय्या यांनी अनिल परबांच्या रिसॉर्टबाबत एफआयआर दाखल करण्याच्या मागणीसाठी शनिवारी दिवसभर दापोलीमध्ये आंदोलन केले त्यानंतर आज गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोतांनी अहिल्यादेवी होळकर यांच्या स्मारकाच्या लोकार्पणावरुन शरद पवारांना आव्हान दिले. या पार्श्वभूमीवर अमोल मिटकरी यांनी ट्वीटरवरुन टीकास्त्र डागले. ''हाय होल्टेज ड्रामेबाजाना महाराष्ट्रातील जनता आता कंटाळली आहे. काल कोकणात तोतला व आज इकडे मंगळसुत्र चोर जो थयथयाट करत आहेत तो थयथयाट राज्यातील हुशार तरुणाई पाहते आहे. हा ड्रामा व हे ड्रामेबाज म्हणजे महाराष्ट्रात साचलेली घाण आहे. आगामी काळात ही घाण जनताच साफ करेल. #मंगळसुत्रचोर'', अशा शब्दात अमोल मिटकरी यांनी टीका केली.
हाय होल्टेज ड्रामेबाजाना महाराष्ट्रातील जनता आता कंटाळली आहे. काल कोकणात तोतला
— आ. अमोल रामकृष्ण मिटकरी (@amolmitkari22) March 27, 2022
व आज इकडे मंगळसुत्र चोर जो थयथयाट करत आहेत तो थयथयाट राज्यातील हुशार तरुणाई पाहते आहे. हा ड्रामा व हे ड्रामेबाज म्हणजे महाराष्ट्रात साचलेली घाण आहे . आगामी काळात ही घाण जनताच साफ करेल.#मंगळसुत्रचोर
लोकार्पण झाल्याचा पडळकरांचा दावा
सांगलीतील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्याच्या लोकार्पणावरुन गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत आक्रमक झालेले पाहायला मिळाले. या पुतळ्याचे लोकार्पण राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते होणार होते. त्याला पडळकर आणि खोत यांनी विरोध दर्शवला आणि दोन्ही नेते रस्त्यावर उतरले. या सर्व गोंधळात पुतळ्याचा लोकार्पण सोहळा पार पडल्याचा दावा आमदार गोपीचंद पडळकर यांनी केला आहे. कडेकोट पोलीस बंदोबस्तात पडळकर यांना होळकर यांच्या पुतळ्याचे लोकार्पण करणे शक्य नव्हते, त्यामुळे पडळकरांनी पुन्हा एकदा आपला गनिमीकावा दाखवला आहे. अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्यावर ड्रोनद्वारे पुष्पवृष्टी करुन लोकार्पण केल्याचा दावा पडळकर यांनी केला आहे.