३०-३५ वर्ष एकटा नाथाभाऊ पुरून उरलाय; एकनाथ खडसेंची विरोधकांवर टीका
By ऑनलाइन लोकमत | Published: September 1, 2022 04:30 PM2022-09-01T16:30:21+5:302022-09-01T16:36:57+5:30
जळगाव जिल्ह्यात मी सातत्याने ३० वर्ष निवडून आलोय आणि आता पुन्हा ६ वर्षासाठी आमदार झालोय. त्यामुळे ३६ वर्ष जिल्ह्याचं प्रतिनिधित्व करण्याची संधी मला मिळाली असं खडसे म्हणाले.
जळगाव - गेल्या ४० वर्षापासून जिल्ह्याच्या राजकारणात मी सक्रीय आहे. या कालावधीत ३०-३५ एकमेव एकनाथ खडसे हा विरोधकांना त्यांच्याशी लढणारा आणि समर्थपणे त्यांचा सामना करणारा एकमेव माणूस दिसतोय. या जिल्ह्यात शून्यातून भाजपा उभा राहिला. लोकांनी मला चांगला प्रतिसाद दिला. अनेक आमदार, खासदार निवडून आले. हे पक्षाचं यश तसेच नेतृत्वाचेही यश असते असं सांगत राष्ट्रवादी आमदार एकनाथ खडसेंनीभाजपावर निशाणा साधला आहे.
एकनाथ खडसे म्हणाले की, जळगाव जिल्ह्यात मी सातत्याने ३० वर्ष निवडून आलोय आणि आता पुन्हा ६ वर्षासाठी आमदार झालोय. त्यामुळे ३६ वर्ष जिल्ह्याचं प्रतिनिधित्व करण्याची संधी मला मिळाली. जनतेने माझ्यावर विश्वास टाकला. नाथाभाऊला नाउमेद केल्याशिवाय त्यांना यश मिळणार नाही हे विरोधकांना माहिती आहे. जिल्हा बँका, जिल्हा दूध संघ अनेक ठिकाणी विरोधकांना अपयश आले असं त्यांनी सांगितले. त्याचसोबत सारे विरोधक एकवटून नाथाभाऊला विरोध करणे हेच एकमेव काम विरोधकांकडे उरलं आहे. परंतु जोपर्यंत जनता एकनाथ खडसेंच्या पाठिशी आहे तोपर्यंत सारे एकत्र आले तरी या विरोधकांना यश येणार नाही असा टोलाही एकनाथ खडसेंनी लगावला आहे.
मुख्यमंत्र्यांना सदबुद्धी लाभो...
राज्यातील सत्तासंघर्षाचं प्रकरण कोर्टात आहे. अद्याप यावर कुठलाही निकाल लागला नाही. राज्यातील मंत्रिमंडळ विस्तार लांबवावा लागला असला तरी अजूनही पालकमंत्र्यांची नियुक्ती करण्यात आली नाही. त्यामुळे राज्यातील जिल्ह्यांना पालकमंत्री लवकर द्यावा अशी सदबुद्धी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना गणरायानं द्यावी असं साकडं आमदार एकनाथ खडसेंनी घातलं.