"माझे पादत्राणे घेऊनच ते मत मागायचे", एकनाथ खडसेंची गिरीश महाजनांवर बोचरी टीका
By ऑनलाइन लोकमत | Published: July 10, 2022 07:38 PM2022-07-10T19:38:11+5:302022-07-10T19:39:08+5:30
'मंदिरात गेले तर प्रसाद संपला अन् बाहेर आले तर चप्पल चोरीला गेली', अशा प्रकारची टीका महाजन यांनी खडसेंवर केली होती.
मुंबई: भाजप सोडून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सामील झालेले एकनाथ खडसे (Eknath Khadse) अनेकदा भाजपवर अतिशय तिखट शब्दात टीका करताना दिसतात. यातच खडसेंना राष्ट्रवादीकडून विधान परिषद मिळाली, पण त्यांचे सरकार गेले, त्यामुळे सोशल मीडियावर खडसेंवर विनोद होत आहेत. या विनोदाचा आधार घेऊन भाजप नेते गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनी खडसेंवर टीका केली होती. त्या टीकेला आता खडसेंनी खोचक शब्दात उत्तर दिले आहे.
'माझे पादत्राने घेऊन मत मागायचे'
माध्यमांशी संवाद साधताना एकनाथ खडसे यांनी गिरीश महाजनांच्या टीकेविषयी विचारण्यात आले. त्यावर बोलताना खडसे म्हणाले की, "गिरीश महाजन बालिश आहेत, प्रगल्भ विचारांचे नाहीत. त्यांनी आयुष्यभर माझ्या पादत्राणांची सेवा केली, आज माझ्या पादत्राणांची आठवण झाली आहे. माझे पादत्राणे घेऊनच ते मत मागायचे, त्यामुळे स्वाभाविकपणे त्यांचे माझ्या पादत्राणाकडे अधिक लक्ष असतं. पण, त्यांच्या बोलण्याकडे लक्ष देण्याची गरज नाही," अशी बोचरी खडसे यांनी केली.
काय म्हणाले होते गिरीश महाजन?
एकनाथ खडसे महाविकास आघाडीत आले आणि सरकार कोसळले, अशा प्रकारच्या सोशल मीडियावरील विनोदाचा आधार घेत त्यांनी आमदार खडसेंवर टीका केली होती. "एकनाथ खडसे यांना आमदारकीवरच समाधान मानावे लागणार आहे. मंदिरात गेले तर प्रसाद संपला अन् बाहेर आले तर चप्पल चोरीला गेली, अशी त्यांची स्थिती झाली आहे,'' अशी बोचरी टीका गिरीश महाजन यांनी केली होती.