वैफल्यग्रस्त भावनेतून अनंत गीतेंचं विधान; राष्ट्रवादी खासदार सुनील तटकरेंनी घेतला खरपूस समाचार
By ऑनलाइन लोकमत | Published: September 21, 2021 12:59 PM2021-09-21T12:59:11+5:302021-09-21T13:01:48+5:30
स्थानिक पातळीवर कलगीतुरा असण्याचं कारण नाही. राज्यात महाविकास आघाडीचं सरकार आहे. रायगडमध्ये महाविकास आघाडी उत्तम काम करत आहे असं सुनील तटकरे म्हणाले.
मुंबई - शरद पवार हे देशाचे नेते आणि महाविकास आघाडीचे जनक आहेत. भाजपाच्या ओझ्याखाली दबलेल्या अनंत गीतेचा स्वाभिमान मागच्या निवडणुकीनंतर गळून पडला. वैफल्यग्रस्त भावनेतून अनंत गीते यांनी हे विधान केले. ज्यांना राजकीय स्थान उरलं नाही ते असे उपद्व्याप करत असतात अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार सुनील तटकरे यांनी अनंत गीते(Anant Gite) यांच्या विधानाचा समाचार घेतला आहे.
पत्रकार परिषद घेत खासदार सुनील तटकरे(Sunil Tatkare) म्हणाले की, देशाच्या राजकीय घडामोडीत राष्ट्रवादी आणि शरद पवारांचे अढळ स्थान आहे. त्यामुळे एखाद्या व्यक्तीने त्याबद्दल बोलल्याने ते कमी होणार नाही. सहनही होत नाही आणि सांगता येत नाही अशी अवस्था अनंत गीते यांची झाली आहे. स्वत:च्या सावलीला घाबरणारी माणसं असं करत असतात. चंद्रकांत पाटलांनी(BJP Chandrakant Patil) पाठीत खंजीर खुपसला हे वक्तव्य कुणाबद्दल केले हे सर्वांना माहिती आहे. चंद्रकांत पाटील यांनी शिवसेनेबद्दल जे विधान केले त्याबद्दल बोलण्याचं धाडस फक्त संजय राऊत यांनीच दाखवलं. परंतु शिवसेनेच्या जीवावर ६ वेळा निवडून त्याबद्दल काही बोलले नाही असं त्यांनी सांगितले.
“शिवसेनेच्या कुठल्याही नेत्याची नार्को टेस्ट करा, एकच सत्य बाहेर येईल ते म्हणजे...”
त्याचसोबत स्थानिक पातळीवर कलगीतुरा असण्याचं कारण नाही. राज्यात महाविकास आघाडीचं सरकार आहे. रायगडमध्ये महाविकास आघाडी उत्तम काम करत आहे. स्थानिक शिवसेना(Shivsena) आमदारांसोबत चर्चा झाली. आमचं काम जिल्ह्यात सुरू आहे. ज्या स्थितीत हे सरकार स्थापन झालं ते ५ वर्षासाठी चांगले काम करेल. पुढच्या निवडणुकीतही ही आघाडी कायम राहील यात शंका नाही. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर महाविकास आघाडी स्थापन होताना जे काही घडलं त्याचा मी साक्षीदार आहे. हे सरकार भक्कम विचाराने स्थापन झालं आहे. उद्धव ठाकरे, अजित पवार आणि बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वात हे सरकार स्थापन झाले आहे. कुठल्याही नेत्याने बोलताना तारतम्य बाळगलं पाहिजे. निवडणुकीत पराजय आणि नैराश्य आल्यानं असं विधान केले असावे असा टोला खासदार सुनील तटकरे यांनी अनंत गीतेंना लगावला.
दरम्यान, वैफल्यग्रस्त भावनेतून आणि निवडणुकीत पराजय झाल्याने त्यांनी असं विधान केले असावेत. शरद पवार हे महाविकास आघाडीचे जनक आहे. त्यांच्यावर बोलणं म्हणजे सूर्यावर थूंकण्याचा प्रकार आहे. राजकारणात अडगळीत पडल्यामुळे अनंत गीते यांना नैराश्य आलं आहे. शरद पवारांचं अढळ स्थान एखाद्या व्यक्तीनं बोलल्यावर कमी होणार नाही. अनंत गीते यांना समज देण्याबाबत शिवसेनेचा अंतर्गत प्रश्न आहे असंही सुनील तटकरेंनी स्पष्ट केले.
शरद पवार हे आमचे नेते नाहीत – अनंत गीते
मुख्यमंत्री आपला आहे म्हणून राज्यात सरकार आपले आहे. बाकी काँग्रेस-राष्ट्रवादी आपले नव्हेत. महाविकास आघाडीचं सरकार आहे. सत्ता मविआ नेते सांभाळतील. तुमची आणि माझी जबाबदारी आपलं गाव सांभाळायचं आहे. त्यावेळी आम्हाला महाविकास आघाडीचा नव्हे तर शिवसेनेचाच विचार करायचा आहे. काँग्रेस-राष्ट्रवादी एकमेकांचे तोंड बघत होते का? या दोन्ही पक्षांचा विचार एक आहे का? दोन काँग्रेस एकमेकांच्या विचाराचे होऊ शकत नाही मग शिवसेना काँग्रेसी विचारांची होऊ शकते का? राष्ट्रवादीचा जन्मच काँग्रेसच्या पाठीत खंजीर खुपसून झालेला आहे. राज्यात महाविकास आघाडी सरकार असलं तरी आम्ही शिवसैनिक आहोत शिवसैनिकच राहणार. आपली ओळख आपण कधीही विसरता कामा नये. आमचा नेता फक्त बाळासाहेब ठाकरे आहेत. इतर कुणीही होऊ शकत नाही. मग त्या नेत्याने काहीही उपाधी लावू दे. मग जाणता राजा असं स्वत:ला म्हणवलं तरीही ने आमचे नेते नाहीत. गुरु नाहीत. असा अप्रत्यक्ष टोला शिवसेनेचे नेते आणि माजी केंद्रीय मंत्री अनंत गीते(Anant Gite) यांनी शरद पवारांना लगावला.