Supriya Sule: “केंद्राने खासदारांना रुपयाही दिला नाही, ठाकरे सरकारने आमदारांना ५ कोटी दिले”: सुप्रिया सुळे
By ऑनलाइन लोकमत | Published: April 23, 2022 12:40 PM2022-04-23T12:40:45+5:302022-04-23T12:41:36+5:30
Supriya Sule: महाराष्ट्रात कोरोनाच्या संकटकाळातही प्रचंड कामे झाली आहेत. विकासाची कामे झाली, असे सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे.
कराड: गेल्या काही दिवसांपासून राज्यात विविध घटनांवरून राजकीय वातावरण तापल्याचे पाहायला मिळत आहे. यातच राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी केंद्र सरकारवर ताशेरे ओढत निशाणा साधला आहे. केंद्रातील मोदी सरकारने खासदारांना एकही रुपया दिलेला नाही. पण, महाविकास आघाडीच्या (Maha Vikas Aghadi) ठाकरे सरकारने आमदारांना पाच कोटी रुपये दिल्याचे सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे.
एक महिला म्हणून महागाई किती प्रमाणात वाढली, याचा मला अंदाज आहे. गेला महिनाभर संसद सत्र सुरू असताना यावर अनेकदा सभागृहात बोलले होते. तुम्ही हवे तर रेकॉर्ड काढून पाहू शकता. मी डेटाबेसवर विश्वास ठेवते. आता कुठे मुलांना कामे मिळायला सुरुवात झाली आहे. सगळी यंत्रणा आता सुरू झाली आहे, असे सुप्रिया सुळे यांनी यावेळी बोलताना सांगितले. त्या कराड येथे पत्रकारांशी बोलत होत्या. मी वास्तवतेमध्ये जगते. एका जबाबदर पदावर आहे, लोकप्रतिनिधी म्हणून गांभीर्याने माझे काम करते, असे सुप्रिया सुळे यांनी नमूद केले.
ठाकरे सरकारने आमदारांना ५ कोटी दिले
महाराष्ट्र सरकारचा सगळा डेटा काढा. कोरोना काळात प्रचंड कामे झाली आहेत. विकासाची कामे झाली. आम्ही केंद्रात प्रतिनिधी आहोत. आमचे दुःख आम्हाला माहिती आहे. गेल्या दोन वर्षात केंद्र सरकारने एकही रुपयाचा फंड एकाही खासदाराला दिलेला नाही. मात्र, या राज्यातील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि बाळासाहेब थोरात यांच्या महाविकास आघाडीच्या सरकारने ५ कोटी एकेका मतदारसंघाला दिले आहेत, असे सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे. तसेच पती सदानंद सुळे यांना इन्कम टॅक्सची नोटीस आल्याप्रकरणी विचारले असता आम्ही उत्तर दिले आहे, लढलुंगी मैं, अशी थेट प्रतिक्रिया सुप्रिया सुळे यांनी दिली.
दरम्यान, राज ठाकरे यांनी शरद पवार नास्तिक आहेत. त्यांना कधीही मंदिरात जाताना पाहिले नाही, असे म्हटले होते. अलीकडेच मी सोलापूर दौऱ्यावर असताना सिद्धेश्वर महाराजांच्या मंदिरात गेले होते. तेव्हा तेथील अध्यक्षांनी माझा सत्कार केला आणि मला सांगितले की, ताई तुम्ही एक दोन वेळा इथे आला असाल, दादाही एखाद-दोन वेळा आले असतील, परंतु पवारसाहेब अनेकदा या मंदिरात येऊन गेले आहे. सोलापूरचे पालकमंत्री असताना या मंदिरात ते कायम यायचे, अशी एक आठवण सुप्रिया सुळे यांनी यावेळी सांगितली.