Maharashtra Politics: “सत्तेत कोणीतरी संवेदनशील राजकारणी आहे, याचा आनंद”; सुप्रिया सुळेंचा बच्चू कडूंना पाठिंबा!
By ऑनलाइन लोकमत | Published: October 27, 2022 04:19 PM2022-10-27T16:19:05+5:302022-10-27T16:20:37+5:30
Maharashtra News: बच्चू कडूंनी प्रचंड काम केले आहे. वेदना व संवेदनशीलपणा हा त्यांच्या वक्तव्यातून दिसला, असे सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे.
Maharashtra Politics: एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या बंडखोरीनंतर त्यांच्यासोबत गेलेले आमदार बच्चू कडू (Bacchu Kadu) आणि भाजप समर्थक अपक्ष आमदार रवी राणा (Ravi Rana) यांच्यात सध्या जोरदार आरोप प्रत्यारोप सुरू आहेत. रवी राणा यांच्या आरोपांमुळे संतप्त झालेल्या बच्चू कडू यांनी सरकारमधून बाहेर पडण्याचा इशारा दिला आहे. यावरून राजकीय वर्तुळातून अनेक प्रतिक्रिया येत असून, राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी यावर भाष्य करत, बच्चू कडू संवेदनशील आहेत आणि सत्तेत कोणीतरी संवेदनशील राजकारणी आहे, याचा आनंद असल्याचे सुप्रिया सुळे यांनी सांगितले.
या राज्यात सत्तेत असणारे कोणीतरी संवेदनशील आहे. त्यामुळे बच्चू कडू यांचे आभार मानते की, त्यांनी आरोग्य क्षेत्रात अपंगांसाठी इतके प्रचंड काम केलेय आणि त्यांच्या वेदना व त्यांचा संवेदनशीलपणा हा त्यांच्या वक्तव्यातून दिसला आहे. मला आनंद वाटतो की, सत्तेतील कोणतरी संवेदनशील राजकारणी या राज्यात आहेत, असे सुप्रिया सुळे यांनी सांगितले.
असा काहीतरी व्यवहार झाला असावा
बच्चू कडू हे एक संवेदनशील नेते आहेत. हे त्यांनी पुन्हा एकदा सिद्ध केले आहे. ५० खोक्यांबद्दल एवढ्यासाठीच बोलले, याचे कारण ५० खोक्यांचा आरोप झाला ते कोणी घेतले नाही हे कोणीच म्हटले नाही. उलट या ईडी सरकारमधील एक मंत्री मी ऑनरेकॉर्ड या वृत्तवाहिनीवरच मी पाहिले, की ते असे म्हणालेत की तुम्हाला ५० खोके हवे आहेत का? त्यामुळे त्यावर शिक्कामोर्तब झाला की असा काहीतरी व्यवहार झाला असावा. अशी एक साधरणपणे जनतेच्या मनात शंका आली असावी. त्यामुळे सातत्याने ५० खोके बद्दल जी चर्चा होते, ती समाजात सगळीकडे व्हायला लागली. गाव, वाडी, वस्तीवर जरी तुम्ही भाषण करायला गेलात, तर खालून लगेच म्हणतात हे ताई बघा ५० खोके वाले आहेत. त्यामुळे ही गाव, वाडी, वस्तीपर्यंत पोहोचलेली गोष्ट आहे, असे सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे.
दरम्यान, पन्नास खोक्यांचा आरोप विरोधकांकडून होत असताना आम्ही दुर्लक्ष केले. पण सत्तेत सहभागी असलेले रवी राणा यांच्याकडून चुकीचे आरोप झाल्याने जनतेत चुकीचा संदेश गेला आहे. राणांच्या आरोपामुळे शिंदे सरकारला पाठिंबा देणारे इतर आमदारही दुखावले आहेत. आम्ही आठ ते दहा आमदार एकत्र बसणार आहोत. प्रहारच्या राज्यभरातील कार्यकर्त्यांशीही आपण चर्चा करू. १ नोव्हेंबरपर्यंत राणा यांनी माफी मागितली नाही किंवा आरोपाशी संबंधित पुरावे दिले नाही तर वेगळा निर्णय घेऊ व बच्चू कडू स्टाईलनेच आरोपांना उत्तर देऊ, असा इशारा बच्चू कडू यांनी दिला आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"