Maharashtra Politics: भाजपचे ‘मिशन बारामती’ आव्हान सुप्रिया सुळेंनी स्विकारले; म्हणाल्या, “मी स्वत:...”
By ऑनलाइन लोकमत | Published: September 20, 2022 09:05 PM2022-09-20T21:05:20+5:302022-09-20T21:06:21+5:30
Maharashtra News: अमेठी जिंकली तर बारामती जिंकायला काय अडचण, असा सवाल करत बारामतीत विकास झालेलाच नाही, असा दावा भाजपकडून करण्यात आला आहे.
Maharashtra Politics: २०२४ मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकांसाठी (Lok Sabha Election 2024) अनेक पक्षांनी आतापासूनच तयारीला सुरुवात केली असून, यामध्ये भाजप आघाडीवर असल्याचे दिसत आहे. लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने रणनीति आखली असून, त्याचाच एक भाग म्हणून केंद्रीय नेते आणि मंत्री देशभरात दौरे करत आहेत. महाराष्ट्रात भाजपच्या मिशन बारामतीकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले असून, केंद्रीय मंत्री निर्मला सीतारामनबारामती दौऱ्यावर जाणार आहेत. यातच राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळेंनी (Supriya Sule) हे आव्हान स्विकारल्याचे सांगितले जात आहे.
कर्जत जमखेडचे माजी आमदार आणि भारतीय जनता पक्षाचे माजी मंत्री राम शिंदे यांनी निर्मला सीतारामन यांच्या दौऱ्यावर संदर्भात पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली. यावेळी राम शिंदे यांनी बारामती जिंकणार असल्याचा निर्धार व्यक्त केला. आम्ही अमेठी जिंकली तर बारामती जिंकायला काय अडचण, असा सवाल राम शिंदे यांनी केला. त्याचसोबत बारामतीचा विकास झालेलाच नाही, असा आरोप राम शिंदे यांनी केलाय. याबाबत सुप्रिया सुळे यांना प्रतिक्रिया विचारण्यात आली.
मी स्वतः निर्मला सीतारामन यांना बारामतीचा विकास दाखवेन
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन बारामतीत येत आहेत. सीताराम बारामती आल्यानंतर बारामतीमध्ये अनेक संस्था आहेत, ज्या त्यांनी पाहाव्यात. त्यासाठी माझी ही त्यांना विनंती असेल की, कृषी विज्ञान केंद्र आणि इतर संस्था पाहव्यात यासाठी त्यांना आमंत्रण देण्यात आले आहे . जर सीतारामन यांना वेळ असेल तर मी स्वतः फिरून त्यांना बारामती दाखवेन, असे प्रतिआव्हान सुप्रिया सुळे यांनी दिले आहे.
दरम्यान, बारामती तालुक्यात अजून चाळीस गाव पिण्याच्या पाण्यापासून दूर आहेत. जलयुक्त शिवारमूळे थोडाफार दिलासा त्या तालुक्यात मिळाला आहे. अधिक क्षेत्र सिंचनाखाली क्षेत्र येणे आवश्यक आहे. रस्त्यांची अतिशय वाईट अवस्था आहे. यामुळे ते जो विकासाचा दावा करत आहेत तो सपशेल फोल ठरलेला आहे, असा आरोप राम शिंदे यांनी केला आहे.