शरद पवारांच्या राष्ट्रपतीपदाच्या उमेदवारीवर कन्या सुप्रिया सुळे स्पष्टच बोलल्या; म्हणाल्या...

By ऑनलाइन लोकमत | Published: June 14, 2022 04:19 PM2022-06-14T16:19:13+5:302022-06-14T16:20:38+5:30

Presidential Election 2022: राष्ट्रपती पदासाठीच्या निवडणुकीसाठी विरोधकांनी मोर्चेबांधणी सुरु केली आहे.

ncp mp supriya sule reaction over sharad pawar candidature in presidential election 2022 | शरद पवारांच्या राष्ट्रपतीपदाच्या उमेदवारीवर कन्या सुप्रिया सुळे स्पष्टच बोलल्या; म्हणाल्या...

शरद पवारांच्या राष्ट्रपतीपदाच्या उमेदवारीवर कन्या सुप्रिया सुळे स्पष्टच बोलल्या; म्हणाल्या...

Next

देशात राष्ट्रपतीपदाच्या (Presidential Election 2022) उमेदवारीसाठी सध्या राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांच्या नावाची जोरदार चर्चा आहे. संयुक्त पुरोगामी आघाडीतील बऱ्याच पक्षांनी शरद पवार यांच्या नावाला पाठिंबा दिला आहे. महाराष्ट्रातील काही घटक पक्षांनीदेखील पवार राष्ट्रपती झाल्यास तो महाराष्ट्राचा सन्मान असेल, असे मत व्यक्त केले आहे. यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी शरद पवार यांच्या राष्ट्रपती निवडणुकीच्या उमेदवारीसंदर्भात प्रतिक्रिया दिली आहे. त्या प्रसारमाध्यमांशी बोलत होत्या.

देशाच्या घटनेचे रक्षण करायचे असेल, जनतेचे स्वातंत्र्य अबाधित ठेवायचे असेल आणि या देशाला राष्ट्रपती पदावरील व्यक्तीच्या अनुभवाचा फायदा व्हावा असे वाटत असेल तर सध्याच्या घडीला असा नेता म्हणून शरद पवार यांचेच नाव समोर येते, असे शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी नमूद केले. शरद पवार यांना भाजपने राष्ट्रपतीपदासाठी संधी दिली पाहिजे. पण अशी संधी देण्यासाठी राज्यकर्त्यांचे मन मोठे असावे लागते. राज्यकर्त्यांचे मन मोठे असेल तरच शरद पवार यांच्यासारख्या नेत्यांना पाठबळ दिले जाते, असा टोलाही संजय राऊतांनी लगावला. यानंतर आता सुप्रिया सुळे यांनी यावर भाष्य केले आहे. 

मला वैयक्तिक मताचा फार कमी अधिकार असतो

मला याबदल काहीच माहिती नाही. मी एका संघटनेत काम करते, मी एक खासदार आहे, त्यामुळे मला वैयक्तिक मताचा फार कमी अधिकार असतो, असे सांगत सुप्रिया सुळे यांनी यासंदर्भात अधिक बोलणे टाळले. तसेच काँग्रेस पक्षाने पाठिंबा दिल्याबद्दल सुप्रिया सुळे यांनी यावेळी आभार मानले. राज्यात काँग्रेसने राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी शरद पवार यांचे नाव समोर येत असेल तर आमचा पाठिंबा राहील, असे जाहीर केले आहे. यासंदर्भात शरद पवार यांना विचारले असता, आपण या स्पर्धेत नाही असे स्पष्ट केले असल्याचे वृत्त आहे. मी शर्यतीत नाही. मी राष्ट्रपतीपदासाठी विरोधी पक्षाचा उमेदवार असणार नाही, असे शरद पवारांनी सांगितल्याचे म्हटले जात आहे. त्यामुळे, आता या चर्चेला पूर्णविराम मिळाल्याची चर्चा आहे. 

दरम्यान, राष्ट्रपती पदासाठीच्या निवडणुकीसाठी विरोधकांनी मोर्चेबांधणी सुरु केली आहे. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी पुढाकार घेतला असून त्यांनी बिगर भाजपाशासित राज्यांचे मुख्यमंत्री तसेच २२ विरोधी पक्षाच्या नेत्यांना दिल्लीत बैठकीसाठी आमंत्रित केले आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचा कार्यकाळ २४ जुलै रोजी संपत आहे. देशाच्या नव्या राष्ट्रपतींची निवड करण्यासाठी निवडणूक आयोगाने १८ जुलै रोजी मतदान होणार असल्याचे जाहीर केले आहे. या निवडणुकीची मतमोजणी प्रक्रिया २१ जुलै रोजी पार पडेल.
 

Web Title: ncp mp supriya sule reaction over sharad pawar candidature in presidential election 2022

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.