Maharashtra Politics: अदानी प्रकरणाच्या चौकशीवरुन विरोधकांमध्ये फूट पडलीय का? सुप्रिया सुळेंनी स्पष्टच सांगितले
By ऑनलाइन लोकमत | Published: April 10, 2023 01:13 PM2023-04-10T13:13:12+5:302023-04-10T13:14:31+5:30
Maharashtra News: कोणत्या गोष्टीला किती महत्व द्यायचे, हे सर्वांना कळले पाहिजे, असे सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे.
Maharashtra Politics: अमेरिका स्थित हिंडेनबर्ग संस्थेने अदानी समूहाबाबत प्रसिद्ध केलेल्या अहवालानंतर अदानी समूहाला प्रचंड नुकसान झाले. अदानींच्या विविध कंपन्यांमध्ये गुंतवणूक केलेल्या कंपन्यांनाही नुकसाना सहन करावे लागले. यावरून काँग्रेससह विरोधी पक्षांनी केंद्रातील मोदी सरकारवर तीव्र शब्दांत टीका केली. तसेच याची संसदीय समितीमार्फत चौकशी झालीच पाहिजे, अशी ठाम भूमिका घेतली आहे. मात्र, शरद पवार यांनी याबाबत वेगळी भूमिका घेत जेपीसीची गरज नसल्याचे म्हटले होते. यावरून आता विरोधकांमध्ये फूट पडल्याची चर्चा सुरू झाली असून, याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांना प्रश्न विचारण्यात आला होता.
हिंडेनबर्ग अहवालातून उपस्थित करण्यात आलेल्या मुद्द्यावरून संसदेच्या संयुक्त समितीमार्फत चौकशी करण्याच्या मागणीमुळे संसदेत बराच काळ कामकाज होऊ शकले नाही. त्याचे पडसाद भांडवली बाजारात उमटल्यावर सर्वोच्च न्यायालयाने निवृत्त न्यायमूर्तीच्या अध्यक्षतेखाली तज्ज्ञांची चौकशी समिती नियुक्त केली आहे. त्यानंतर संयुक्त समितीची मागणी लावून धरणे योग्य नाही. अहवालाच्या मुद्द्यावरून देशभरात गोंधळ झाला आणि त्याची किंमत देशाच्या अर्थव्यवस्थेला चुकवावी लागली, असे स्पष्ट मत राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी व्यक्त केले होते. यानंतर आता सुप्रिया सुळे यांना विरोधकांमध्ये फूट पडल्यावरून प्रश्न विचारण्यात आला. त्या मीडियाशी बोलत होत्या.
अदानी प्रकरणाच्या चौकशीवरुन विरोधकांमध्ये फूट पडलीय का?
हा फूट होण्याचा मुद्दा नाही आहे. महागाई आहे किंवा नाही, या प्रश्नावरून आमच्यात फूट पडेल. पण, महागाई, बेरोजगारी, कांद्याचे भावावरून आमच्यात कोणतेही मतभेद नाहीत. त्यामुळे कोणत्या गोष्टीला किती महत्व द्यायचे, हे सर्वांना कळले पाहिजे. अदानींची चौकशी सुरू आहे. मात्र, आज दूधाचा भाव सर्वांसाठी महत्वाचा नाही का? दूध आयात केले, तर शेतकऱ्यांचे काय हाल होतील. शेतकऱ्यांना हे परवडणारे आहे का? आधीच शेतकरी राज्यात आत्महत्या करत आहे. दूधाच्या आयातीसंदर्भात बातमी वृत्तपत्रात आल्यावर शरद पवारांनी तातडीने केंद्रीय मंत्र्याना पत्र लिहिले, अशी माहिती सुप्रिया सुळे यांनी यावेळी बोलताना दिली.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"