Maharashtra Politics: “शिंदे गट आणि शिवसेनेतील न्यायालयीन लढाई दुर्दैवी, बाळासाहेबांना किती वेदना होत असतील”
By ऑनलाइन लोकमत | Published: September 27, 2022 08:57 PM2022-09-27T20:57:25+5:302022-09-27T20:58:18+5:30
Maharashtra News: बाळासाहेब ठाकरे यांचे सगळेच ओरबाडून घेतले जात आहे. हे मनाला न पटण्यासारखे आहे, असे सुप्रिया सुळेंनी म्हटले आहे.
Maharashtra Politics:शिवसेना कोणाची? पक्ष चिन्ह कोणाचे आणि शिंदे-ठाकरे वादावर सर्वोच्च न्यायालयात दोन्ही बाजुंनी जोरदार युक्तीवाद केला. यानंतर सर्वोच्च न्यायालयाच्या पाच सदस्यीय घटनापीठाने उद्धव ठाकरेंच्या (Uddhav Thackeray) शिवसेनाला मोठा धक्का देत एकनाथ शिंदे (Eknath Shinde) गटाला मोठा दिलासा दिला. निवडणूक आयोगाला सर्वोच्च न्यायालयाने पुढील कार्यवाही करण्यास होकार दिला आहे. यामुळे पक्ष कोणाचा आणि निवडणूक चिन्ह कोणाचे यावर निवडणूक आयोग कार्यवाही करण्यास मोकळा झाला आहे. यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. शिंदे गट आणि शिवसेनेतील न्यायालयीन लढाई दुर्दैवी असून, बाळासाहेबांना किती वेदना होत असतील, असे सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे.
सध्या सुरू असलेली न्यायालयीन लढाई खूप दुर्दैवी आहे. बाळासाहेब ठाकरे यांना किती वेदना होत असतील. तुमच्यात मतभेद असतील तर वेगळे घर करायला हवे. तुम्हाला शुभेच्छा असतील. पण ओरबाडून घेतले जात असून ठाकरे कुटुंबावर नको ते आरोप केले जात आहेत. ते बाळासाहेब ठाकरे यांचे नाव वापरत आहेत. मात्र त्यांना बाळासाहेबांची मुले आणि नातवंडे चालत नाहीत. हे खूप दुर्दैवी असून आपल्या महाराष्ट्राला न शोभणारे आहे, अशी खंत व्यक्त करत शब्दांत सुप्रिया सुळे यांनी शिंदे गटावर निशाणा साधला.
आता वैचारिक लढाई संपलेली आहे
शिंदे गट आणि शिवसेनेतील न्यायालयीन लढाई खूप दुर्दैवी आहे. आता वैचारिक लढाई संपलेली आहे. बाळासाहेब ठाकरे यांचे सगळेच ओरबाडून घेतले जात आहे. बाळासाहेब आणि माँसाहेबांच्या आयुष्यातील अविभाज्य भाग म्हणजे त्यांची मुले आणि नातवंडे आहेत. बाळासाहेबांच्या मुलावरच हल्ला केला जात आहे. हे संयुक्तिक नाही. हे मनाला न पटण्यासारखे आहे, असे सुप्रिया सुळे यांनी सांगितले.
दरम्यान, लांब कशाला जायचे. शरद पवार यांचेच उदाहरण घ्या. शरद पवार यांच्याविरोधात जेव्हा काँग्रेसने कारवाई केली होती, तेव्हा त्यांनी वेगळा पक्ष स्थापन केला होता. विचार एक असेल तर आपले वेगळे घर करावे. वैचारिक लढाई असेल, तर काहीही हरकत नाही. या भांडणामुळे, न्यायालयीन लढाईमुळे बाळासाहेब ठाकरेंना किती वेदना होत असतील, असे सुप्रिया सुळे म्हणाल्या.