Maharashtra Politics: “केंद्र सरकार अनेक चांगल्या गोष्टी करतं, नरेंद्र मोदी माझे आवडते पंतप्रधान”: सुप्रिया सुळे
By ऑनलाइन लोकमत | Published: November 20, 2022 05:25 PM2022-11-20T17:25:54+5:302022-11-20T17:26:54+5:30
Maharashtra News: एका कार्यक्रमात बोलताना सुप्रिया सुळे यांनी केंद्र सरकारच्या कामाचे आणि पंतप्रधान मोदींचे तोंडभरुन कौतुक केले आहे.
Maharashtra Politics: आताच्या घडीला अनेकविध मुद्द्यांवरून राज्यातील राजकारण तापलेले पाहायला मिळत आहे. काँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी वीर सावरकरांवर केलेल्या विधानांचे पडसाद अद्यापही उमटत आहेत. भाजप, शिंदे गटाकडून राहुल गांधींवर जोरदार टीका करण्यात आली. यानंतर आता राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) आणि भाजप प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांवर केलेल्या विधानांमुळे विरोधकांकडून सत्तधारी भाजपवर जोरदार निशाणा साधला जात आहे. या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी केंद्र सरकारचे तोंडभरुन कौतुक करताना नरेंद्र मोदी हे आवडते पंतप्रधान असल्याचे म्हटले आहे.
एका कार्यक्रमात बोलताना सुप्रिया सुळे यांनी राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेची प्रशंसा केली. तसेच राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या विधानावर तीव्र शब्दांत प्रतिक्रिया व्यक्त केली. आमच्या छत्रपतींच्या विरोधात बोलणार असाल तर आम्ही खपवून घेणार नाही. चूक एकदा होऊ शकते. मात्र वारंवार करणे म्हंजे ती त्यांची चॉईस. हर हर महादेव चित्रपटामध्ये चुकीच्या गोष्टी दाखवल्या गेल्या. भाजप नेते सुधांशू त्रिवेदी यांनी जे बोलले असा इतिहास कोणी वाचला का? यांना कोणी इतिहास कसा सांगत नाही, अशी विचारणा सुप्रिया सुळे यांनी केली. तसेच छत्रपती यांच्या विरोधात बोलले तर हे काहीही करू शकतात. छत्रपतींच्या विरोधात कोणीही बोलला तर आम्ही खपवून घेणार नाही. या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस आंदोलन करणार, असा इशाराही सुळे यांनी दिला.
नरेंद्र मोदी माझे आवडते पंतप्रधान आहेत
केंद्र सरकारच्या विरोधात मी लिहीत नाही. ते काही चांगल्या गोष्टी देखील करत आहेत. नरेंद्र मोदी माझे आवडते पंतप्रधान आहेत, असे सुप्रिया सुळे यांनी नमूद केले. तसेच भारत जोडो यात्रा मला आवडते. आम्ही एका विचारांचे आहोत. काँग्रेस नेते राहुल गांधी चांगला प्रयोग करत आहेत. भारत जोडो एक वेगळा प्रयत्न आहे. भारत जोडो यात्रा ही फक्त राहुल गांधीची यात्रा नाही तर सर्व भारतीयांची आहे, असे सुप्रिया सुळे यांनी सांगितले.
दरम्यान, आम्ही मराठी संस्कृतीचे राजकारण करणार. आम्ही छत्रपातींचे मावळे, दिल्लीत झूकणार नाही आणि दिल्लीला केव्हाच घाबरणार नाही, असे सुप्रिया सुळे म्हणाल्या.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"