Maharashtra Politics: “PM मोदींची काळजी वाटते, ग्रामपंचायत निवडणूक असली तरी धावाधाव करावी लागते”: सुप्रिया सुळे
By ऑनलाइन लोकमत | Published: January 19, 2023 03:21 PM2023-01-19T15:21:19+5:302023-01-19T15:22:38+5:30
Maharashtra News: पूर्वी भाजपकडे मोठी फळी होती. आता ती दिसत नाही, असे सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे.
Maharashtra Politics: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मुंबई दौऱ्यावरून शिवसेनेच्या ठाकरे गटासह महाविकास आघाडीतील नेत्यांनी टीकास्त्र सोडले आहे. यावरून सत्ताधारी शिंदे-फडणवीस सरकार आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडताना दिसत आहेत. यातच आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या आणि खासदार सुप्रिया सुळे यांनीही पंतप्रधान मोदी यांच्या मुंबई दौऱ्यावरून टोला लगावला आहे. नरेंद्र मोदी हे पंतप्रधान आहेत. त्यांचे महाराष्ट्रात स्वागतच आहे. पण मला काळजी वाटते. कारण ग्रामपंचायत निवडणूक असली तरी मोदींना धावाधाव करावी लागते, असे सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे.
प्रसारमाध्यमांशी बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या की, ग्रामपंचायत निवडणूक असो की, लोकसभेची निवडणूक नरेंद्र मोदी यांनाच धावाधाव करावी लागते. भाजपकडे मोदींशिवाय दुसरा पर्याय नाही. पूर्वी भाजपकडे मोठी फळी होती. आता ती दिसत नाही, या शब्दांत सुप्रिया सुळे यांनी भाजपवर टीका केली. तसेच कसबा पोटनिवडणुकीवर महाविकास आघाडीत चर्चा होईल. त्यानंतर निर्णय घेतला जाईल, अशी माहिती सुप्रिया सुळे यांनी दिली.
आमच्यावर बोलून कुणाची प्रसिद्धी होत असेल तर होऊ द्या
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांचा मुलगा पार्थ पवार यांनी शिंदे गटाचे नेते आणि मंत्री शंभुराज देसाई यांची भेट घेतली. यानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. यावरून गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस आणि पवार कुटुंबावर टीका केली. यासंदर्भात सुप्रिया सुळे यांना विचारणा करण्यात आली. यावर, मच्या घरावर बोलल्याशिवाय बातमी होत नाही. आमच्यावर बोलून कुणाची प्रसिद्धी होत असेल तर होऊ द्या, या शब्दांत सुप्रिया सुळे यांनी पडळकरांच्या टीकेचा समाचार घेतला.
दरम्यान, शिवसेनेची स्थापना बाळासाहेब ठाकरे यांनी केली आहे. ते हयात असतानाच त्यांनी त्यांचे उत्तराधिकारी नेमले होते. उद्धव ठाकरे हे त्यांचे उत्तराधिकारी आहेत. स्वत: बाळासाहेबांनी नियुक्त केलेले आहेत. उद्धव ठाकरे अनेक वर्ष पक्षाचे अध्यक्ष आहेत. त्यामुळे उद्धव ठाकरे हेच शिवसेनेचे अध्यक्ष आहेत, असे सुप्रिया सुळे यांनी स्पष्टपणे सांगितले.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"