Maharashtra Politics: “जमत नसेल तर देवेंद्र फडणवीसांनी गृहमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा”; सुप्रिया सुळेंनी सुनावले
By ऑनलाइन लोकमत | Published: January 30, 2023 01:51 PM2023-01-30T13:51:08+5:302023-01-30T13:52:44+5:30
Maharashtra News: कायदा आणि सुव्यवस्थेवरून सुप्रिया सुळे यांनी राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली.
Maharashtra Politics: गेल्या अनेक दिवसांपासून विविध मुद्द्यांवरून राष्ट्रवादी काँग्रेसकडून सातत्याने सत्ताधारी शिंदे-फडणवीस सरकारवर टीकास्त्र सोडले जात आहे. महाविकास आघाडीचे सरकार कोसळल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे राज्याच्या राजकारणात सक्रीय झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. यातच राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेप्रश्नी सुप्रिया सुळे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधत, जमत नसेल तर गृहमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा, असे म्हटले आहे.
कोयता गँगने प्रचंड धुडगूस घातला आहे. त्यामुळे नागरीक भयभीत झाले आहेत. त्यावरून खासदार सुप्रिया सुळे यांनी थेट गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर हल्लाबोल केला आहे. दौंडमधली गुन्हेगारी, खून, पुण्यातील कोयता गँग, महिलांवर अत्याचार हे सातत्याने राज्यात होत आहे. राज्यात एवढे सगळे होतेय हे गृहमंत्रालयाचे अपयश आहे. त्यामुळे जमत नसेल तर देवेंद्र फडणवीस यांनी गृहमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा. हे माझे वैयक्तिक मत आहे, असे सुप्रिया सुळे यांनी सुनावले. तसेच एकनाथजी आणि देवेंद्रजींना ईडी म्हणलेले आवडते. ईडी म्हणजे नक्की एकनाथ, देवेंद्र का आणखी काही माहिती नाही, असा टोलाही सुप्रिया सुळे यांनी लगावला.
सरकार नियमाने चालत नाही
कसबा पोटनिवडणुकीवेळी आचारसंहितेचा भंग झाल्याचा दावा केला जात आहे. यावर बोलताना, मला आश्चर्य वाटत नाही. कारण हे सरकार नियमाने चालत नाही. कायदे फक्त विरोधकांसाठी आहे. आचारसंहितेचा भंग करणाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी पक्ष करेलच, असे सुप्रिया सुळे म्हणाल्या. तसेच ज्या योजना केंद्र सरकारच्या आहेत, त्या राज्यात राबवल्या जात नाहीत. माझ्या मतदारसंघात या योजना राबवत आहे. अजितदादा पालकमंत्री असताना दर शनिवारी लोकांना भेटत असत. आपल्या जिल्ह्यात एक लाखांवर लाभार्थी आहेत. साहित्य पाठवण्याची मागणी केंद्राकडे केली आहे. यात राजकारण नको. तुम्ही म्हणाल तो फोटो लावू. पण साहित्य द्या, अशी खोचक टीका सुप्रिया सुळे यांनी केली.
दरम्यान, आपल्या सरकारने दिव्यांग बांधवांसाठी खूप केले. बाकीच्या राज्यांना निधी मिळतो मग महाराष्ट्राला का मिळत नाही? महाराष्ट्रात देखील काही मोजक्या जिल्ह्यांनाच हा निधी दिला जातो. मग हा निधी राज्यासाठी आहे की पक्षासाठी आहे? आम्ही कधीच असल्या कामात राजकरण आणत नाही. दुजाभाव करणाऱ्या अशा सरकारचा धिक्कार केलाच पाहिजे. या बांधवांना मदत नाही मिळाली तर हा गुन्हा आहे आणि केंद्र सरकार गुन्हेगार आहे, अशी घणाघाती टीका सुप्रिया सुळे यांनी केली.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"