जयंतरावांनी माझा करेक्ट कार्यक्रम केलाय; सुप्रिया सुळेंच्या विधानानं हशा पिकला
By ऑनलाइन लोकमत | Published: June 21, 2023 08:23 PM2023-06-21T20:23:40+5:302023-06-21T20:28:50+5:30
पुढचे ११ महिने आपल्याला काय करायचंय हे नियोजन आपण आखले पाहिजे. बूथ कमिटीचे काम राष्ट्रवादीने प्राधान्याने केले असं सुप्रिया सुळेंनी सांगितले.
मुंबई - राष्ट्रवादी काँग्रेसच्या रौप्य महोत्सवीवर्षानिमित्त पक्षाकडून मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला शरद पवारांपासून पक्षाचे सर्वच दिग्गज नेते उपस्थित होते. या कार्यक्रमाला पहिल्यांदाच पक्षाच्या कार्यकारी अध्यक्षा म्हणून सुप्रिया सुळे यांनी भाषण केले. परंतु भाषणाला सुरुवात करताना सुप्रिया सुळेंनी जयंत पाटलांकडे बघून जयंत पाटलांनी माझा करेक्ट कार्यक्रम केलाय असं वाटायला लागलं असं विधान केल्यानं सभागृहात हशा पिकला.
सुप्रिया सुळे म्हणाल्या की, जयंतरावांनी मला बोर्ड एग्जामला बसवले, छगन भुजबळांच्या भाषणानंतर आता गंभीर प्रशासकीय भाषण करणे हे खूप अडचणीचे काम असते. अनेक वक्त्यांना ही अडचण येत असेल. आज फार मोठी जबाबदारी माझ्या खांद्यावर टाकली आहे. आता काळच ठरवेल ही जबाबदारी मी पेलू शकेन की नाही. परंतु देशातील आणि राज्यातील ज्या ज्या जबाबदाऱ्या पक्ष माझ्यावर टाकेल पूर्ण निष्ठेने आणि मेहनतीने मी पूर्ण करेन असं त्यांनी सांगितले.
तसेच पुढचे ११ महिने आपल्याला काय करायचंय हे नियोजन आपण आखले पाहिजे. बूथ कमिटीचे काम राष्ट्रवादीने प्राधान्याने केले पाहिजे. मंत्री राहिलेल्या आमदारांना ५-७ मतदारसंघ द्यावेत, त्यांचा अनुभव त्या मतदारसंघात घ्यावा. पक्षाशी सलग्न आघाडीने कार्यक्रम राबवावे. दौरा आणि संपर्क यात खूप चांगले काम करतो. पण प्रत्येक जिल्ह्यात नेत्याने महिन्यातून एकदा गेले पाहिजे. पुढील वर्षभर राज्य पिंजून काढा. जेणेकरून राष्ट्रवादी काँग्रेसपेक्षा दुसरा पक्षच नाही असं लोकांना वाटायला हवा. आपण भूमिका काय घेतो याबाबत स्पष्टता हवी असंही सुप्रिया सुळेंनी कार्यकर्त्यांना सांगितले.
दरम्यान, धनगरांना आरक्षण देण्याबाबत टीसचा रिपोर्ट सरकारने पब्लिश केला नाही. मी स्वत: धनगर समाजाबाबत संसदेत ५ दिवस बोलणारी मी खासदार आहे. एकच विधेयक आणा, मराठा, धनगर आणि सर्वच आरक्षणाबाबत चर्चा झाली. त्यावेळी धनगरांना आरक्षण देण्यात आमचा विरोध आहे असं भाजपा नेत्याने संसदेत ऑन रेकॉर्ड सांगतिले. राज्यात आरक्षण देऊ म्हणतात आणि दिल्लीत त्यांची भूमिका बदलते असा आरोप सुप्रिया सुळेंनी भाजपावर केला.
देशाला कुणी वाचवले असेल तर...
कोविड काळात राजेश टोपे यांनी जे काम केले त्याचे कौतुक देशपातळीवर होतेय. जातीवरून अनेक पक्ष सध्या बोर्ड लावतात. रेमडेशिवीरसाठी किती लोकांनी फोन केले, ते औषध सिपला कंपनी बनवते, त्याचा मालक यूको हमीद आहेत. तुम्हाला पूनावालाने निर्माण केलेली लस चालते. तुम्हाला औषध चालते, पण धर्म आला तर त्यांचा द्वेष तुम्ही करता. रेमडेशिवीर घेताना बनवणाऱ्याची जात विचारली का? पूनावाला हे अल्पसंख्याक आहेत. देशाला कुणी वाचवले असेल तर अल्पसंख्याक असलेले सायरस पुनावाला यांच्या कंपनीने वाचवले असं सांगत सुप्रिया सुळे यांनी हिंदू-मुस्लीम संघर्षावर भाष्य केले.