Supriya Sule Exclusive: सातच्या आत घरात...; सुप्रिया सुळेंनी सांगितली पवार घराण्याची शिस्त
By ऑनलाइन लोकमत | Published: September 11, 2021 06:38 PM2021-09-11T18:38:33+5:302021-09-11T18:42:44+5:30
राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळेंनी सांगितली पवार घराण्याची शिस्त; जागवल्या बालपणीच्या आठवणी
मुंबई: आम्ही अतिशय शिस्तीत वाढलो. आताच्या मुलांना आहे तितकं स्वातंत्र्य आम्हाला नव्हतं आणि तो काळदेखील वेगळा होता. मी शाळेत असताना बाबा मंत्रालयात जाताना कधीतरी मला शाळेजवळ सोडायचे. मात्र तेव्हा मी त्यांना शाळेपासून दूर असलेल्या कोपऱ्याजवळ सोडायला सांगायचे. कारण शाळेत बाबा सोडायला येतात आणि तेही गाडीनं हेच मला पटायचं नाही, आवडायचं नाही, अशा शब्दांत राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळेंनी लहानपणीच्या आठवणींना उजाळा दिला. लोकमतचे वरिष्ठ पत्रकार अतुल कुलकर्णी यांनी सुळेंशी संवाद साधला.
आताच्या काळात वडील मुलांच्या बाबतीत अतिशय सजग असतात. त्यांच्या अभ्यासावर त्यांचं लक्ष असतं. मी लहान होते, त्यावेळची परिस्थिती अतिशय वेगळी होती. आपलं मूल कोणत्या इयत्तेत शिकतंय, याचीही त्यांना माहिती नसायची. ती आघाडी आईकडे असायची. मात्र बालपणीचे ते दिवस अतिशय छान होते, असं म्हणत सुप्रिया सुळे लहानपणीच्या आठवणींत रमल्या.
काँग्रेसची अवस्था ही ओसाड गावच्या पाटलासारखी झालीय का? शरद पवारांनी परखड शब्दात सुनावलं
आजच्या पिढीला मिळत असलेलं स्वातंत्र्य आणि पवार घराण्यातील शिस्त याबद्दल सुळे भरभरून बोलल्या. 'एका अतिशय मोठ्या घरात माझा जन्म झाला. आमचं कुटुंब खूप मोठं आहे. ते विचारांनी प्रगत आहे. मात्र कपड्यांच्या बाबतीत वगैरे आम्ही तितके प्रगत नाही. मी तरुण असताना सातच्या आत घरात असा नियम होता. त्यानंतर कुठे जायचं असल्यास भावांसोबत जाऊ शकत होते. माझ्या मैत्रिणी रात्री उशिरापर्यंत बाहेर राहू शकत होत्या. मला मात्र ती परवानगी नव्हती,' असं सुळे यांनी सांगितलं.
पश्चिम महाराष्ट्रातील खाद्यसंस्कृती जास्त चांगली की मुंबईची असा वाद तुमच्या घरात कधी होतो का, यावर आमच्याकडे सगळे एकत्र असल्यावर कोणाकडचा मसाला उत्तम यावर एक तास तासांचा परिसंवाद घडू शकतो, असं उत्तर सुळेंनी दिलं. माझं सासर पवारांच्या तुलनेत लाखपटीनं मॉडर्न आहे. सासूबाई अँग्लोइंडियन आहेत. त्यामुळे त्यांच्याकडची एक वेगळी खाद्यसंस्कृती आहे. तुमच्याकडचा मसाला जास्त छान की आमच्याकडचा यावर घरात तीन तास गप्पा होऊ शकतात अशी परिस्थिती आहे, असं सुळेंनी हसतहसत सांगितलं.