Supriya Sule, Shinde Fadnavis Govt: "माझी मुख्यमंत्री शिंदे अन् उपमुख्यमंत्री फडणवीसांना विनंती आहे की..."
By ऑनलाइन लोकमत | Published: October 27, 2022 07:27 PM2022-10-27T19:27:11+5:302022-10-27T19:28:05+5:30
सुप्रिया सुळेंनी राज्य सरकारकडे केली खास मागणी
Supriya Sule, Eknath Shinde Devendra Fadnavis Govt: राज्यात महाविकास आघाडीचे सरकार कोसळल्यानंतर एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकार स्थापन झाले. या सरकारमधील पहिला मंत्रिमंडळ विस्तार पार पडला. दुसरा मंत्रिमंडळ विस्तारदेखील लवकरच केले जाईल, असे सांगितले जात आहे. गेल्या काही दिवसांपासून शिंदे-फडणवीस सरकार आणि इतर पक्षातील नेतेमंडळीच्या मागण्या असा क्रम चर्चेत आहे. अंधेरीच्या पोटनिवडणुकीत राज ठाकरे यांनी पत्र दिल्यानंतर भाजपाने ती निवडणूक बिनविरोध होण्याच्या दृष्टीने उमेदवारी अर्ज मागे घेतला. त्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी ट्विटरवरून शिंदे-फडणवीसांकडे एक विशेष मागणी केली आहे.
"संपूर्ण महाराष्ट्रात अतिवृष्टीने शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावून घेतला गेला. अनेक ठिकाणी शेतात पाणी साठलेले असून पीके जागीच कुजून गेली आहेत. शेतकऱ्यांची ही दिवाळी अक्षरशः अंधारात गेली. राज्यकर्त्यांनी या परिस्थितीचा आढावा घेऊन तातडीने ओला दुष्काळ जाहीर करण्याची गरज होती. परंतु अद्याप त्याबाबत निर्णय झालेला नाही. माझी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विनंती आहे की, राज्यातील शेती व शेतकऱ्यांची स्थिती पाहता कृपया आपण ओला दुष्काळ जाहिर करावा. यासोबतच शेतकऱ्यांना थेट आर्थिक मदत देखील देण्याबाबत सकारात्मक विचार करावा", अशी अत्यंत कळकळीची विनंती व मागणी सुप्रिया सुळे यांनी केली आहे.
राज ठाकरेंनी पत्राद्वारे केली होती मागणी
महाराष्ट्रात पावसाचे थैमान पाहता शेतकर्याचं झालेलं नुकसान मोठं आहे. अशामध्ये कोरोना संकटानंतर यंदा पुन्हा उत्साहात दिवाळी साजरा केली जाणार आहे. पण नुकसानग्रस्त शेतकर्यांची देखील दिवाळी गोड व्हावी यासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी युद्धपातळीवर पंचनामे करून मदत उपलब्ध करून द्या आणि राज्यात 'ओला दुष्काळ' जाहीर करा असं आवाहन करणारे पत्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना पाठवलं आहे. याशिवाय, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार कैलास पाटील यांनी ऐन दिवाळीत बेमुदत उपोषण सुरू केले. पावसाने राज्यातल्या शेतकऱ्यांना मेटाकुटीला आणले आहे. त्या पार्श्वभूमीवर ओला दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी पाटील यांनी केली. उद्धव ठाकरे यांच्या मराठवाडा दौऱ्यानंतर कैलास पाटील यांनी हे उपोषण सुरू केले.
मंत्री म्हणतात- दुष्काळाची परिस्थिती नाही!
राज्यात परतीच्या पावसामुळे मोठं नुकसान झालं असून शेतकरी हवालदिल झाला आहे. अशात शेतकऱ्यांना मदत मिळावी अशी मागणी राज्यभरातून होत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शेतकऱ्यांच्या नुकसानीचे लवकरात लवकर पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी असे आदेश दिले आहेत. मात्र अजून ओला दुष्काळ जाहीर करण्यासारखी परिस्थिती नाही, असे विधान अब्दुल सत्तार यांनी केले. त्या विधानानंतर त्यांच्यावर टीकादेखील झाली.