भाजप, शिवसेनेच्या खेळीने राष्ट्रवादीच्या सरदारांची पळापळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2019 05:07 AM2019-08-28T05:07:17+5:302019-08-28T05:07:39+5:30

मोहिते, क्षीरसागर, पिचडांनंतर आता पद्मसिंह पाटलांचा नंबर

NCP neta Running after Shiv Sena, bjp's play | भाजप, शिवसेनेच्या खेळीने राष्ट्रवादीच्या सरदारांची पळापळ

भाजप, शिवसेनेच्या खेळीने राष्ट्रवादीच्या सरदारांची पळापळ

googlenewsNext

यदु जोशी।
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : आपापल्या भागात प्रभाव असलेल्या नेत्यांचा (सरदारांचा) एकत्रित पक्ष म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस अशी या पक्षाची व्याख्या केली जाते, मग आता या सरदारांनाच आपल्याकडे ओढले तर आपोआपच या पक्षाला घरघर लागेल अशी रणनीती भाजप व शिवसेनेने आखली असून त्यानुसार एकेका सरदारांना आपल्याकडे ओढण्याची स्पर्धा दोघांमध्ये सुरू आहे.


२०१४ च्या विधानसभा निवडणूक निकालानंतर राष्ट्रवादीचे दिग्गज नेते आमचे कमीत कमी ५० आमदार नक्कीच निवडून येतील, असे छातीठोकपणे सांगत होते. ३५ नेते असे आहेत की जे त्या-त्या भागात अत्यंत प्रभावी आहेत आणि ते पराभूत होण्याचा प्रश्नच नाही, उर्वरित १५ जागा जिंकणे आमच्यासाठी कठीण नाही, असा तर्क त्यावेळी राष्ट्रवादीचे नेते मांडत होते. ५० तर नाही पण राष्ट्रवादीने ४२ जागा जिंकल्या आणि जयंत पाटीलांपासून मनोहर नाईकांपर्यंत असे पक्षाचे सरदारच बहुतेक जिंकले होते. प्रभावी नेत्यांची मजबूत फळी हे राष्ट्रवादीचे गंडस्थळ, त्या गंडस्थळावरच हल्ला करण्याची खेळी भाजप-शिवसेनेकडून खेळली जात आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी असे सरदार आपल्या गळाला लावणे आधीच सुरू केले आहे.


शरद पवार यांनी त्यांच्या राजकीय खेळीचा भाग म्हणून राज्याच्या विविध भागामध्ये राजकीय घराणी उभी केली आणि त्यांना ताकद देण्याचे काम केले. विखेंसारख्या काही घराण्यांना कायम सुरूंग लावण्याचेही अनेकदा प्रयत्न केले.

भुजबळ सेनेच्या वाटेवर
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना दणका देत त्यावेळचे दिग्गज नेते छगन भुजबळ यांना पवारांनी काँग्रेसमध्ये आणून राज्यात वादळ निर्माण केले. तेच भुजबळ आज शिवसेनेच्या वाटेवर असल्याचे म्हटले जाते.


सावल्यांनी साथ सोडली
काँग्रेसच्या आदिवासी नेत्यांना शह देण्यासाठी शरद पवार यांनी मधुकर पिचड आणि विजयकुमार गावित यांना पुढे केले. आज दोघेही भाजपमध्ये आहेत. भुजबळांप्रमाणेच गणेश नाईक या कट्टर शिवसेना नेत्यास पवारांनी सोबत घेतले. तेच नाईक आज राष्ट्रवादीत अस्वस्थ आहेत. पवारांना त्यांच्या सावल्या सोडून जात आहेत.


राजे तुम्ही सुद्धा!
साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले हे भाजपच्या वाटेवर असल्याचे बोलले जाते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी त्यांचे निकटचे संबंध आहेत. पुसदच्या नाईक घराण्यातील निलय नाईक हे पूर्वीच भाजपमध्ये गेले आणि आता विधान परिषदेचे सदस्य आहेत. येत्या काही दिवसात राष्ट्रवादीचे आणखी काही नेते भाजप वा शिवसेनेत जाताना दिसतील.


भीती उरली नाही
ज्या घराण्यांना पवारांनी बळ दिले त्याच घराण्यांतील सरदारांना आता त्यांच्यासोबत राहणे राजकीय असुरक्षिततेचे वाटत असल्याने एकेक जण साथ सोडून जात असल्याचे चित्र आहे. पवारांना साथ दिली नाही तर ते आपलं राजकारण संपवतील अशी भीती पूर्वी वाटायची. आज ती भीती राहिली नसल्याने त्यांची साथ सोडण्याचे धारिष्टय त्यांच्या जवळचे लोक करू लागले आहेत.

सरदार पळू लागले
बीडच्या राजकारणाचा विचार ज्या क्षीरसागर घराण्याशिवाय करता येत नाही त्यातील जयदत्त क्षीरसागर यांनी साहेबांची साथ सोडून शिवबंधन बांधले आणि लगेच मंत्रीदेखील झाले. शिवसेनेला धक्का देत काही वर्षांपूर्वी राष्ट्रवादीत गेलेले आ. भास्कर जाधव हे शिवसेनेच्या मार्गावर आहेत.
सोलापूर जिल्ह्यातील बार्शीचे आमदार दिलीप सोपल हे पवारांचे निष्ठावान पण ते उद्या शिवबंधन बांधून घेत आहेत. याच जिल्ह्यातील करमाळ्याच्या बागल परिवाराने नेहमीच पवारांना साथ दिली पण गेल्यावेळी विधानसभा निवडणुकीत अत्यल्प मतांनी पराभूत झालेल्या रश्मी बागल परवा शिवसेनेत गेल्या.
अहमदनगरचे राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांच्या शिवसेनेच्या मार्गावर असल्याचे म्हटले जाते.

Web Title: NCP neta Running after Shiv Sena, bjp's play

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.