सांगवीत ‘राष्ट्रवादी नाही पुन्हा...’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2017 12:19 AM2017-02-27T00:19:11+5:302017-02-27T00:19:11+5:30

माजी नगरसेवकांना तिकीट नाकारून पक्षाने केलेले राजकारण शेवटी राष्ट्रवादीच्या पराभवास कारणीभूत ठरले

NCP is not again ... | सांगवीत ‘राष्ट्रवादी नाही पुन्हा...’

सांगवीत ‘राष्ट्रवादी नाही पुन्हा...’

Next


सांगवी : माजी नगरसेवकांना तिकीट नाकारून पक्षाने केलेले राजकारण शेवटी राष्ट्रवादीच्या पराभवास कारणीभूत ठरले आणि भाजपाच्या हातात सत्ता आली, असे सांगवीतील एकंदरीत चित्र पाहायला मिळत आहे. राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यातील भाजपाची सरशी जिव्हारी लागण्यासारखी असून, पक्षाच्या ध्येयधोरणांवर आता विचार करून परत एकदा कामाला लागावे लागणार आहे.
सांगवीतील प्रभाग ३१ मध्ये संवेदनशील प्रभाग असल्याने साऱ्यांचे लक्ष प्रभागाकडे लागले होते. अ गटामधून भाजपाचे अंबरनाथ कांबळे राजकारणात नवखे असताना कमळाच्या साथीने ११,०७० मतांनी निवडून आले. त्यांनी राष्ट्रवादीचे उमेदवार बाळासाहेब सोनावणे यांचा ८,००० मताधिक्याने पराभव केला, तर प्रभाग ब गटामधून भाजपाच्या माधवी राजापुरे यांनी राष्ट्रवादीच्या भक्ती टण्णू यांना ३,३२३ मतांच्या फरकाने पराभूत केले.
राजकारणातील नवखा चेहरा असलेल्या भाजपा पॅनलच्या तिसऱ्या उमेदवार सीमा चौघुले यांनी राष्ट्रवादीच्या उमेदवार उमा पाडुळे यांना ५,२३५ मतांच्या फरकाने पराभूत केले. चौघुले यांना १०,१४० मते मिळाली. सगळ्यात लक्षवेधी लढत जगताप विरुद्ध जगताप अशी ३१ ड गटामध्ये होती. इथे विद्यमान नगरसेवक राजेंद्र जगताप आणि नवनाथ जगताप समोरासमोर आल्याने दोघांच्या प्रतिष्ठेसाठी महत्त्वाची लढत म्हटली जात होती. आमदार जगतापांकडून बंधू राजेंद्र जगताप यांना कमळ चिन्ह मिळाले, तर नवनाथ जगताप यांनी अपक्ष म्हणून उमेदवारीअर्ज भरला होता. नवनाथ जगताप यांची प्रभागातील पकड किती मजबूत आहे हे यामधून दिसून आले. प्रभागातील आमदार जगताप यांचे वर्चस्व कायम असून भाजपाला रोखण्यात राष्ट्रवादी पक्षाला अपयश आले असेच म्हणावे लागेल. (वार्ताहर)

Web Title: NCP is not again ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.