“मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर डोळा असणाऱ्या सगळ्यांना शुभेच्छा”; प्रफुल्ल पटेलांचा टोला
By ऑनलाइन लोकमत | Published: August 23, 2023 03:03 PM2023-08-23T15:03:28+5:302023-08-23T15:07:27+5:30
Praful Patel: महायुतीमध्ये चांगला समन्वय आहे. उगाच कुणी वादावादीचा लावायचा प्रयत्न करत असेल तर ते चुकीचे आहे, त्यात तथ्य नाही, असे प्रफुल्ल पटेल यांनी म्हटले आहे.
Praful Patel: गेल्या काही दिवसांपासून शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादीतून बाहेर पडल्यावर सत्तेत सहभागी झालेला अजित पवार गट यांच्यात मतभेद असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. मुख्यमंत्र्यांनी घ्यायचा बैठका अजित पवार घेत असल्याचे समोर आले होते. यावरूनही शिंदे गट आणि अजित पवार गट यांच्यात मतभेद असल्याचे बोलले जात होते. तसेच अजित पवार लवकरच मुख्यमंत्री होतील, असे दावेही केले जात आहेत. मात्र, यातच अजित पवार गटाचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
येत्या १५ ते २० दिवसात महाराष्ट्राच्या राजकारणात काय बदल होतात ते जनता बघेल. यात मुख्य खुर्चीपासून बदलाला सुरुवात होणार आहे. पुढचा सप्टेंबर हा महिना या राज्यातल्या सत्ताबदलाचा असेल. माझ्या सूत्रांनी मला माहिती दिली आहे. राज्यातील सत्तेत बदल होईल. एकूणच ज्या पद्धतीने हे सरकार चालले आहे त्यावरून सर्वगोष्टी स्पष्ट आहेत. ज्यांना मुख्यमंत्री केले आहे, त्यांना काम करु दिले जात नाही आणि जे मुख्यमंत्री होणार होते ते अर्धे मुख्यमंत्री झाले आहेत. त्यानंतर त्यांच्या अर्ध्यातला अर्धा हिस्सा काढून घेतला. त्यामुळे १०५ आमदार असूनही सत्तेतला पाव हिस्सा मिळणार असेल तर ही मंडळी काय स्वस्थ बसणारी आहे का? माझ्या सूत्रांनी १०० टक्के सांगितले आहे की राज्यात मुख्यमंत्री बदलाचे वारे जोरात सुरू आहेत, असा मोठा दावा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केला होता. यावर प्रफुल्ल पटेल यांनी खोचक शब्दांत टोला लगावला.
मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर डोळा असणाऱ्या सगळ्यांना शुभेच्छा
मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर डोळा असणाऱ्या सगळ्यांना शुभेच्छा. वडेट्टीवार यांची प्रगती झाली आहे. सप्टेंबरमध्ये सरकार पडणार आहे असे ते म्हणत असतील तर त्यावर मला पाणी फेरायचे नाही, सगळ्यांना शुभेच्छा, असे सांगत विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केलेल्या टीकेचा प्रफुल्ल पटेल यांनी समाचार घेतला.
दरम्यान, अजित पवार महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री, वित्तमंत्री आहे. त्यामुळे त्यांना प्रत्येक विभागाची माहिती घेण्याचा, बैठक घेण्याचा आणि योग्य रीतीने निर्णय घ्यायचा अधिकार आहे. त्यात काहीही चूक नाही. आमच्या महायुतीमध्ये तिन्ही घटक पक्षात चांगला समन्वय आहे. प्रत्येक गोष्टीत एकमेकांशी संवाद साधून आम्ही निर्णय घेत असतो. यात कोणी उगाच वादावादी लावायचा प्रयत्न करत असतील तर ते चुकीचे आहे, त्यात तथ्य नाही, असे प्रफुल्ल पटेल यांनी सांगितले.