सत्तांध भाजपला उखडून टाका; शरद पवार यांचा घणाघात
By ऑनलाइन लोकमत | Published: April 24, 2022 04:39 AM2022-04-24T04:39:47+5:302022-04-24T04:40:53+5:30
तपोवन मैदानावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या परिवार संवाद यात्रेच्या विराट सांगता सभेत ते बोलत होते.
कोल्हापूर : केंद्रीय तपास यंत्रणेचा गैरवापर करून आमची तोंडे बंद करू शकतो, असे कोणाला वाटत असेल तर ते मूर्खाच्या नंदनवनात राहत आहेत. यापुढेही राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी या प्रवृत्तीचा योग्य प्रकारे समाचार घेत सत्तांध भाजपला उखडून टाका, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी येथे केले. युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज हे आमच्या हृदयात आहेत; मात्र शाहू, फुले, आंबेडकर यांचे नाव का घेता म्हणून विचारणाऱ्यांना महाराष्ट्र समजलाच नाही, अशा शब्दांत पवार यांनी राज ठाकरे यांच्यावर निशाणा साधला.
येथील तपोवन मैदानावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या परिवार संवाद यात्रेच्या विराट सांगता सभेत ते बोलत होते. या सभेच्या माध्यमातून राष्ट्रवादीने जोरदार शक्तिप्रदर्शन करत आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे रणशिंगच फुंकले. सभेला उपस्थित कार्यकर्त्यांत कमालीचा जोश होता. या सभेला उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, मंत्री छगन भुजबळ, जितेंद्र आव्हाड, राजेश टोपे, धनंजय मुंडे, बाळासाहेब पाटील, हसन मुश्रीफ, खा. प्रफुल्ल पटेल, खा. सुप्रिया सुळे, खा. अमोल कोल्हे आदींसह मान्यवर नेते उपस्थित होते.
पवार म्हणाले, पंडित जवाहरलाल नेहरूंपासून आम्हीपण सत्ता बघितल्या. कोणत्याही देशाचे पंतप्रधान आले की ते मुंबई, हैदराबाद, बंगळुरू आदी महत्त्वाच्या शहरांत येतात. मात्र अलीकडील काळात गुजरातचे दौरे वाढले आहेत. देशाचे नेतृत्व करणाऱ्या व्यक्तींने असा संकुचित विचार करणे देशाला घातक आहे. देवेंद्र फडणवीस हे सत्तासुंदरी कशी मिळेल याच चिंतेत आहेत. त्यांची अवस्था ‘उतावळा नवरा आणि गुडघ्याला बाशिंग’, अशी झाल्याचे एकनाथ खडसे म्हणाले.
‘पिंजऱ्या’तील मास्तरसारखी अवस्था
‘पिंजरा’ चित्रपटातील मास्तरांनी गावात तमाशाला विरोध केला. परंतु तेच नंतर कमळीच्या नादाला लागून तुणतुणे वाजवायला लागले. ज्या राज ठाकरे यांचे शरद पवार यांच्याशी चांगले संबंध होते. तेच आता भाजपचे गुणगान गात आमच्यावर टीका करत आहेत. त्यांची अवस्था ‘पिंजऱ्या’तील मास्तरसारखीच झाली आहे, अशा शब्दांत भुजबळ यांनी टीका केली.