'शरद पवारांनी बाप बदलला नाही, ते स्वत: बाप झाले'; जितेंद्र आव्हाडांचा पुन्हा पलटवार
By ऑनलाइन लोकमत | Published: March 11, 2020 07:00 PM2020-03-11T19:00:05+5:302020-03-11T23:47:00+5:30
गणेश नाईक यांनी उपस्थित केलेल्या सवालावर जितेंद्र आव्हाड यांनी पुन्हा प्रत्युत्तर दिले आहे.
नवी मुंबई महापालिका निवडणुकीच्या निमित्तानं राष्ट्रवादीच्या आजी-माजी नेत्यांमध्ये वाकयुद्ध रंगलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड आणि भाजपा नेते गणेश नाईक यांच्यात चांगलीच जुंपली आहे. बाप बदलणारी औलाद नाही असं म्हणत जितेंद्र आव्हाड यांनी नाईक यांच्यावर जहरी टीका केली होती.
जितेंद्र आव्हाडांच्या टीकेला प्रत्युत्तर देताना गणेश नाईक यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना अप्रत्यक्षपणे लक्ष्य केलं होतं. पक्षांतर करणाऱ्या शरद पवारांची गणनादेखील बाप बदलणाऱ्या औलादींमध्ये करणार का, असा सवाल गणेश नाईक यांनी आव्हाड यांना विचारला होता. मात्र आता पुन्हा गणेश नाईक यांनी उपस्थित केलेल्या सवालावर जितेंद्र आव्हाड यांनी पुन्हा प्रत्युत्तर दिले आहे.
जितेंद्र आव्हाड यांनी ट्विटरवर एक व्हिडिओ शेअर करत म्हणाले की, शरद पवार यांनी बाप बदलला नसून ते स्वत: बाप झाले. शरद पवार यांचा इतिहास गणेश नाईक यांना कितपत माहिती आहे याची मला कल्पना नाही. परंतु गणेश नाईक किती कृतघ्न आहेत हे त्यांनी त्यांच्या विधानातून दाखवून दिलं आहे, असं जितेंद्र आव्हाड यांनी सांगितले. तसेच बाप काढल्याचं वक्तव्य तुम्ही केलं. मी बाप काढला नाही. कुठल्यातरी फडतूस पिक्चरचा फडतूस डायलॉग बोलून तुम्ही बाप काढलात. तेव्हा मी खाली घसरलो की तुम्ही खाली घसरलात? हे जरा आठवून बघा असा सवालही जितेंद्र आव्हाड यांनी उपस्थित केला आहे.
गणेश नाईक कृतघ्न आहेत हे त्यांनीच सिद्ध केल - गृहनिर्माण मंत्री डाॅ जितेंद्र आव्हाड@abpmajhatv@thodkyaat@TV9Marathi@LoksattaLive@Awhadspeaks@NCPspeakspic.twitter.com/HuWpQSoYB1
— Office of Dr. Jitendra Awhad (@AwhadOffice) March 11, 2020
मी पक्ष बदलण्याच्या अनुषंगानं जितेंद्र आव्हाडांनी एक वक्तव्य केलंय की पक्ष बदलणाऱ्यांची औलाद आमची नाही. म्हणजे त्यांनी म्हटलंय की बाप बदलणारी औलाद मी नाही. मात्र माणूस पक्ष एकाएकी बदलत नाही. समाजकारणाला, राजकारणाला गती यावी किंवा स्वाभिमान जतन करता यावा, यासाठी माणूस पक्षांतर करतो असं विधान गणेश नाईक यांनी केले होते. तसेच शरद पवारांनी देखील तीनवेळा पक्ष बदलला आहे. मग पवारसाहेबांची गणनादेखील तुम्ही बाप बदलणाऱ्या औलादीमध्ये करणार का, असा थेट सवाल गणेश नाईक यांनी जितेद्र आव्हाड यांना विचारला होता. माणूस गरज म्हणून पक्ष बदलतो. त्यामुळे आव्हाड यांनी अशा प्रकारे खालच्या स्तरावर येऊन भाष्य करू नये असं देखील गणेश नाईकांनी सांगितले होते.