तीन-चार महिने भूमिगत व्हायचं अन् मग एखादं लेक्चर द्यायचं; पवारांचा राज ठाकरेंना टोला

By ऑनलाइन लोकमत | Published: April 3, 2022 09:25 AM2022-04-03T09:25:17+5:302022-04-03T09:27:29+5:30

राज यांच्या मोदींबद्दलच्या भूमिका काय होत्या, ते काय बोलले होते, हे राज्याला माहित्येय; पवारांनी 'भूतकाळ' सांगितला

ncp president sharad pawar hits back at mns chief raj thackeray | तीन-चार महिने भूमिगत व्हायचं अन् मग एखादं लेक्चर द्यायचं; पवारांचा राज ठाकरेंना टोला

तीन-चार महिने भूमिगत व्हायचं अन् मग एखादं लेक्चर द्यायचं; पवारांचा राज ठाकरेंना टोला

Next

कोल्हापूर: गुढीपाडव्याच्या मेळाव्यात मनसे प्रमुख राज ठाकरेंनी राष्ट्रवादी काँग्रेसवर जोरदार टीका केली. राष्ट्रवादीच्या जन्मानंतर जातीपातीच्या राजकारणाला सुरुवात झाली. शरद पवारांनाच असं राजकारण हवं असल्याचं म्हणत राज यांनी टीकास्त्र सोडलं. या टीकेला शरद पवारांनी प्रत्युत्तर दिलं आहे. सर्व जातीच्या लोकांना सोबत घेऊन पुढे जायचं ही राष्ट्रवादीची भूमिका आहे. राज यांनी राष्ट्रवादीचा गेल्या काही वर्षांतील इतिहास तपासावा, असा सल्ला पवारांनी दिला. ते कोल्हापुरात पत्रकारांशी बोलत होते.

राज यांच्या भूमिकेत सातत्य नसतं. आधी त्यांनी नरेंद्र मोदींच्या कामाचं तोंडभरुन कौतुक केलं. तेव्हा मोदी गुजरातचे मुख्यमंत्री होते. त्यानंतर त्यांनी मोदींच्या कारभारावर सडकून टीका केली. आता ते पुन्हा मोदींचं कौतुक करत आहेत. भाजपच्या जवळपास जाणारी भूमिका घेत आहेत. उद्या ते काय करतील, काय म्हणतील, ते मला सांगता येणार नाही, अशा शब्दांत पवारांनी राज यांना लक्ष्य केलं.

राज ठाकरे ३-४ महिने भूमिगत होतात. मग त्यानंतर एखादं लेक्चर देतात. मग पुन्हा ३ ते ४ महिने भूमिगत होतात, अशा शब्दांत पवारांनी राज यांना टोला हाणला. राज यांच्या राजकारणाचं हेच वैशिष्ट आहे, असंही पवार म्हणाले. राज यांनी उत्तर प्रदेशातील योगी सरकारच्या कामाचं कौतुक केलं. राज यांना उत्तर प्रदेशात नेमकं काय दिसलं ते माहीत नाही. योगींच्या कार्यकाळात शेतकऱ्यांना कारखाली चिरडण्यात आलं. शेतकऱ्यांचं आंदोलन वर्षभर चाललं. मात्र त्याकडे तिथल्या सरकारनं लक्ष दिलं नाही, असं पवार म्हणाले.

राज यांनी मोदींबद्दल आधी काय भूमिका घेतल्या होत्या. ते काय काय म्हणाले होते ते राज्यातल्या जनतेनं पाहिलं आहे. आता त्यांच्यामध्ये गुणात्मक बदल झाला आहे. मात्र हेच राज ठाकरे उद्या काय बोलतील हे कोणीच सांगू शकणार नाही, असं म्हणत पवारांनी राज यांच्या बदलत्या भूमिकांचा समाचार घेतला.
 

Web Title: ncp president sharad pawar hits back at mns chief raj thackeray

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.