राष्ट्रवादीकडून माझ्यावर दबाव आणला जातोय, निरंजन डावखरेंचा आरोप
By ऑनलाइन लोकमत | Published: May 23, 2018 01:34 PM2018-05-23T13:34:04+5:302018-05-23T13:48:13+5:30
दिवंगत नेते वसंतराव डावखरे यांचे चिरंजीव आणि राष्ट्रवादीचे आमदार निरंजन डावखरे यांनी राष्ट्रवादी पक्ष सोडण्याआधीच मोठा गौप्यस्फोट केलाय.
मुंबई- दिवंगत नेते वसंतराव डावखरे यांचे चिरंजीव आणि राष्ट्रवादीचे आमदार निरंजन डावखरे यांनी राष्ट्रवादी पक्ष सोडण्याआधीच मोठा गौप्यस्फोट केलाय. पक्ष सोडू नये, यासाठी दबाव आणला जातोय, असं निरंजन डावखरे म्हणाले आहेत. जितेंद्र आव्हाड, आनंद परांजपे या स्थानिक नेत्यांकडून कोंडी केली जात असल्याने त्यांनी हा निर्णय घेतल्याचे त्यांच्या निकटवर्तीयांनी सांगितले.
निरंजन डावखरेंना भाजपामध्ये आणण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली असून, लवकरच निरंजन भाजपामध्ये दाखल होणार आहेत. निरंजन डावखरे हे सध्या कोकण पदवीधर मतदार संघातून राष्ट्रवादीचे आमदार आहेत. त्यांच्या आमदारकीची टर्म संपत आलेली असतानाच पक्षात कोंडी होऊ लागल्याने ते अस्वस्थ असल्याचे सांगितले जाते. त्यातूनच ते भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांच्या संपर्कात आले. त्यांच्या पक्षांतरांचा मुहूर्त पालघर लोकसभा पोटनिवडणुकीचा ठरविण्यात आल्याने त्याचा फटका काँग्रेसला तर फायदा भाजपाला होणार आहे.
दिवंगत वसंत डावखरे यांना मानणारा एक मोठा वर्ग पालघर, ठाणे जिल्ह्यात आहे. तो भाजपाकडे वळण्याची शक्यता आहे. तसेच भाजपाला ठाणे पट्ट्यात एक तरुण चेहरा लाभणार असल्याने भाजपा नेतेही डावखरेंच्या पक्षप्रवेशासाठी सकारात्मक आहेत.