पंकजा मुंडेंचा राष्ट्रवादीला धक्का; विधानपरिषद निवडणुकीत एका उमेदवाराची तडकाफडकी माघार

By ऑनलाइन लोकमत | Published: May 7, 2018 03:34 PM2018-05-07T15:34:34+5:302018-05-07T16:15:59+5:30

अवघ्या पाच दिवसांत पडद्यामागे झालेल्या वेगवान राजकीय हालचालींनंतर रमेश कराड यांनी सोमवारी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला. धनंजय मुंडे आणि राष्ट्रवादी काँग्रेससाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. 

NCP Ramesh Karad withdrawn from Vidhan Parishad election big setback for Dhanjay Munde | पंकजा मुंडेंचा राष्ट्रवादीला धक्का; विधानपरिषद निवडणुकीत एका उमेदवाराची तडकाफडकी माघार

पंकजा मुंडेंचा राष्ट्रवादीला धक्का; विधानपरिषद निवडणुकीत एका उमेदवाराची तडकाफडकी माघार

Next

उस्मानाबाद : उस्मानाबाद-बीड-लातूर विधान परिषदेची लढत सुरु होण्यापूर्वीच चांगलीच रंगली आहे़ काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचे अधिकृत उमेदवार रमेश कराड यांनी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी अनपेक्षितपणे आपला अर्ज काढून घेतल्याने उस्मानाबादेत राजकीय भूकंप घडला.  दरम्यान, अन्य चार जणांनीही अर्ज काढून घेतल्याने आता महायुतीचे सुरेश धस व अपक्ष अशोक जगदाळे यांच्यात लढत होणार असून, राष्ट्रवादी जगदाळे यांना पाठिंबा देत आहे. 

विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्या उपस्थितीत भाजपाला रामराम करीत राष्ट्रवादीत दाखल झालेल्या रमेश कराड यांनी  २ मे रोजी उमेदवारी दाखल केली होती. त्यांनी प्रचारही सुरू केला होता. अचानकपणे सोमवारी २.३० वाजता अर्ज परत घेतला. त्याचवेळी महायुतीचे उमेदवार सुरेश धस हेही जिल्हाधिकारी कार्यालयात आले होते.  त्यांनी प्रतिक्रिया देताना राष्ट्रवादीवर तोंडसुख घेतले़ ते म्हणाले, राष्ट्रवादीला आपला उमेदवार पाच दिवसही टिकवता आला नाही़ ही त्या पक्षावरची मोठी नामुष्की आहे़ आता अपक्षांच्या पाठीमागे त्यांना धावावे लागत आहे. इतकी केविलवाणी अवस्था राष्ट्रीय पक्ष म्हणवणाºया या पक्षाची झाली असल्याची टीकाही धस यांनी केली़
अपक्ष जगदाळे होणार पुरस्कृत एकूण ७ उमेदवारांपैकी सोमवारी कराडांसह पाचजणांनी माघार घेतल्याने आता रिंगणात धस व अपक्ष अशोक जगदाळे हे दोघेच राहिले आहेत़ जगदाळे हे राष्ट्रवादीतच होते़ त्यांना उमेदवारी न मिळाल्याने त्यांनी अपक्ष म्हणून अर्ज भरला होता़ त्यामुळे आता जगदाळे यांना राष्ट्रवादीकडून पुरस्कृत करण्यात येत आहे़ 

नाट्यमय घडामोडी़
दरम्यान, कराड व इतर अपक्ष अर्ज मागे घेणार असल्याची कुणकुण राष्ट्रवादीच्या नेत्यांना आधीच लागली होती़ त्यामुळे काही स्थानिक नेत्यांनी जगदाळेंचा अर्ज रहावा व जागा बिनविरोध भाजपकडे जावू नये, यासाठी प्रयत्न केले. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार जगदाळे हे सोमवारी राष्ट्रवादीच्या नेत्यांसोबतच होते़

भाजपचा ‘गेमप्लान’?
भाजपने ही निवडणूक बिनविरोध होवून ती आपल्या पदरी पाडून घेण्यासाठी राजकीय खेळ्या केल्याची चर्चा होती़ राष्ट्रवादीचे उमेदवार कराड अर्ज मागे घेत असताना भाजप उमेदवार सुरेश धस, आमदार सुजितसिंह ठाकूर हेही जिल्हाधिकारी कार्यालयात उपस्थित होते़ त्यामुळे हा भाजपचाच ‘गेमप्लान’ असल्याच्या चर्चेस बळ मिळाले़ याबाबत धस व ठाकूर यांनी बोलणे टाळले़

काँग्रेसला प्रतिक्षा पक्षश्रेष्ठींच्या आदेशाची
आघाडीचा धर्म पाळून कराड यांच्या पाठिशी राहण्याची भूमिका काँग्रेसने घेतली होती़ दरम्यान, कराड यांच्या माघारीनंतर आता काँग्रेस जगदाळे यांच्या पाठिशी राहणार का? हा प्रश्न आहे़ याबाबत आमदार मधुकरराव चव्हाण यांनी या संदर्भात पक्षश्रेष्ठींशी बोलू. ते जो आदेश देतील त्यानुसार काम करु, अशी प्रतिक्रिया दिली़

मी नाराज नाही, योग्यवेळी बोलूू : रमेश कराड
अचानक उमेदवारी अर्ज मागे घेतलेल्या रमेश कराड यांनी माध्यमांशी बोलतानाही अतिशय मोजक्या शब्दांत प्रतिक्रिया दिली़ आपण राष्ट्रवादीवर नाराज वगैरे काही नाही़ योग्यवेळ आल्यानंतर बोलेन, असे सांगत माघारीचे नेमके कारण सांगण्याचे टाळले.

Web Title: NCP Ramesh Karad withdrawn from Vidhan Parishad election big setback for Dhanjay Munde

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.