राष्ट्रवादी काँग्रेस भुजबळांना 'कलटी' देऊन दूर पळाला - उद्धव ठाकरे

By admin | Published: September 23, 2016 08:05 AM2016-09-23T08:05:00+5:302016-09-23T08:05:00+5:30

भाजपच्या नेत्या आणि मंत्री पंकजा मुंडे यांनी रुग्णालयात जाऊन छगन भुजबळ यांची भेट घेऊन त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली.

NCP ran away by giving a 'blame' to Bhujbal - Uddhav Thackeray | राष्ट्रवादी काँग्रेस भुजबळांना 'कलटी' देऊन दूर पळाला - उद्धव ठाकरे

राष्ट्रवादी काँग्रेस भुजबळांना 'कलटी' देऊन दूर पळाला - उद्धव ठाकरे

Next

 ऑनलाइन लोकमत 

मुंबई, दि. २३ - भाजपच्या नेत्या आणि मंत्री पंकजा मुंडे यांनी रुग्णालयात जाऊन छगन भुजबळ यांची भेट घेऊन त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. या भेटीकडे राजकीय दृष्टीकोनातून बघणा-यांवर शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी जोरदार टीका केली आहे. मराठा मोर्चांचे ‘तांडव’ बाहेर चालले आहे म्हणून पंकजा मुंडे भुजबळांना भेटल्या काय? असे सवाल करणार्‍यांच्या डोळ्यात सडक्या राजकारणाचा वडस वाढलाय असे उद्धव यांनी अग्रलेखात म्हटले आहे. 
 
छगन भुजबळांची भेट घेणे हे एक धाडसी पाऊल असून, त्यासाठी त्यांनी पंकजा मुंडे यांचे कौतुक केले आहे. प्रफुल्ल पटेल, पवार आणि सुनिल तटकरे यांनी यातून शिकले पाहिजे असे सल्लाही दिला आहे. ज्या राष्ट्रवादीसाठी भुजबळांनी ही सर्व अघोरी कृत्ये केली तो राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आज भुजबळांना ‘कलटी’ देऊन दूर पळाला आहे अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसवर केली आहे. 
 
आसाराम बापूंचा दाखला देऊन या अग्रलेखात न्यायदानाबद्दलही प्रश्न उपस्थित करण्यात आला आहे. लैांगिक शोषणाचा आरोप असलेले आसाराम बापू मागच्या चार वर्षांपासून तुरुंगात आहे. त्याचवेळी गोव्याच्या एका आमदाराला भक्कम पुराव्याच्या आधारावर बलात्काराच्या आरोपाखाली अटक करण्यात आली. पण आठवडयाभरातच त्याची जामिनावर सुटका झाली. गोव्याच्या आमदार महाशयांचे म्हणणे ऐकले जाते व त्यांची सुटका होते, पण आसाराम बापूंचे ऐकले जात नाही. या देशात एकाच गुन्ह्यासाठी दोन कायदे आहेत काय? की कुणाच्या मर्जीनुसार न्यायदेवता काम करते? असे प्रश्न उपस्थित केले आहेत. 
 
काय म्हटले आहे अग्रलेखात 
- आज भुजबळ ‘जात्या’त असले तरी काँग्रेस-राष्ट्रवादीचे अनेक पुढारी ‘सुपा’त आहेत व निदान ‘आत’ले अनुभव आणि व्यवस्थेविषयी जाणून घेण्यासाठी तरी या मंडळींनी भुजबळांना भेटायलाच हवे होते. कर्माची फळे प्रत्येक जण भोगतच असतो, पण तोपर्यंत माणुसकी जपायला काय हरकत आहे? मराठा मोर्चांचे ‘तांडव’ बाहेर चालले आहे म्हणून पंकजा मुंडे भुजबळांना भेटल्या काय? असे सवाल करणार्‍यांच्या डोळ्यात सडक्या राजकारणाचा वडस वाढलाय. पंकजाताई खंगलेल्या, थकलेल्या काकांना भेटायला गेल्या. पटेल, पवार, तटकरे यांनी काही शिकावे असा हा प्रसंग आहे. 
 
- छगन भुजबळ हे आमचे राजकीय विरोधक आहेत, पण सध्या ते ज्या अवस्थेतून जात आहेत त्याबद्दल आम्हाला माणूस म्हणून सहानुभूती आहे. भुजबळ यांनी शिवसेनेच्या तसेच शिवसेनाप्रमुखांच्या बाबतीत जे अघोरी कृत्य केले त्याचा कोळसा आम्हाला इथे उगाळायचा नाही. त्या कर्माचे फळ त्यांना मिळालेच आहे, पण ज्या राष्ट्रवादीसाठी भुजबळांनी ही सर्व अघोरी कृत्ये केली तो राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आज भुजबळांना ‘कलटी’ देऊन दूर पळाला आहे. म्हणूनच पंकजा मुंडे यांनी जे.जे. रुग्णालयात जाऊन भुजबळांची चौकशी केली, प्रकृतीबाबत विचारपूस केली, या धाडसाचे आम्हाला कौतुक वाटते. 
 
- भुजबळ व आसाराम बापू हे बर्‍याच काळापासून तुरुंगात पडले आहेत. दोघांवरील गुन्हे आणि खटल्याचे स्वरूप पूर्णपणे वेगळे आहे, पण आमची न्याययंत्रणा कायद्यानेच चालते की कुणाच्या इशार्‍यावर चालते याचा संशय येतो. गोव्यातील एका आमदार महाशयांवर बलात्कार, लैंगिक शोषणाचे आरोप पुराव्यांसह झाले. संबंधित पीडित मुलीने तसे पोलिसांना सांगितले. भक्कम पुराव्यांच्या आधारे पोलिसांनी या आमदार महाशयांना अटक केली व फक्त आठवडाभरातच हे आमदार महाशय जामिनावर सुटून बाहेर आले. माझ्या विरोधकांनी मला संपविण्यासाठी कट रचल्याचे हे आमदार महाशय सांगतात. खरेखोटे न्यायदेवताच सांगेल, पण बलात्काराच्या आरोपाखालील आमदार महाशय बाहेर येऊन मोकाट सुटले. 
 
- आसाराम बापू हे चारेक वर्षे तुरुंगात पडले आहेत. त्यांच्यावर महिला भक्तांशी गैरवर्तन, त्यांचे शोषण केल्याचा आरोप आहे व त्यांचे जामिनाचे अर्ज रोज फेटाळले जात आहेत. ‘‘मला संपविण्याचा हा विरोधकांचा कट आहे,’’ असे आसाराम बापू सांगतात, पण गोव्याच्या आमदार महाशयांचे म्हणणे ऐकले जाते व त्यांची सुटका होते, पण आसाराम बापूंचे ऐकले जात नाही. या देशात एकाच गुन्ह्यासाठी दोन कायदे आहेत काय? की कुणाच्या मर्जीनुसार न्यायदेवता काम करते? डॉ. सुब्रमण्यम स्वामी यांनी आसाराम बापूंचा खटला चालवला व तेही हतबलतेने म्हणाले, ‘‘आसाराम बापू बाहेर येऊ नयेत असे काही लोकांना वाटते.’’ आता अशा काही लोकांच्या मर्जीवर न्यायदानाचे काम होणार आहे काय? आसाराम बापूंनी गुन्हा केला असेल तर त्याची कठोर शिक्षा ते भोगतील. येथे त्यांची बाजू घेण्याची गरज नाही. फक्त न्यायदानातील तफावत आम्ही दाखवत आहोत. 
 
- पंकजा मुंडे यांच्या पोटात कालवाकालव झाली तशी राष्ट्रवादीच्या तालेवार पुढार्‍यांच्या पोटात झाली नाही. भुजबळांच्या चांगल्या दिवसांत सगळेच ‘साहेब’, ‘भुजबळसाहेब’ म्हणून उदो उदो करीत होते. भुजबळांच्या राजकीय मंचावरील नाट्यमय भाषणांना व विधिमंडळातील ठोसेबाजीला दाद मिळत होती. भुजबळ फार्मवर पाहुणचाराच्या पंगती झडत होत्या, पण आज थकलेल्या व खंगलेल्या भुजबळांना कुणी भेटायला गेले नाही. पंकजा मुंडे जे.जे. रुग्णालयात पोहोचल्या तेव्हा ‘‘यात ‘ओबीसी’चे काही राजकारण तर नाही ना?’’ अशा भुवया उंचावणार्‍यांचीही आम्हाला कीव वाटते. राजकारण गेले चुलीत, पण मला या ‘अंडा सेल’मधून बाहेर काढा अशा मानसिकतेत भुजबळ असावेत. भ्रष्टाचार, आर्थिक गैरव्यवहाराच्या आरोपाखाली भुजबळ ‘आत’ आहेत. आज भुजबळ ‘जात्या’त असले तरी काँग्रेस-राष्ट्रवादीचे अनेक पुढारी ‘सुपा’त आहेत व निदान ‘आत’ले अनुभव आणि व्यवस्थेविषयी जाणून घेण्यासाठी तरी या मंडळींनी भुजबळांना भेटायलाच हवे होते. 
 
- पंकजा मुंडे भेटल्या हे त्यांचे धाडस. गोपीनाथ मुंडे हयात असते तर त्यांनीही अशीच हिंमत दाखवली असती. कर्माची फळे प्रत्येक जण भोगतच असतो, पण तोपर्यंत माणुसकी जपायला काय हरकत आहे? मराठा मोर्चांचे ‘तांडव’ बाहेर चालले आहे म्हणून पंकजा मुंडे भुजबळांना भेटल्या काय? असे सवाल करणार्‍यांच्या डोळ्यात सडक्या राजकारणाचा वडस वाढलाय. पंकजाताई खंगलेल्या, थकलेल्या काकांना भेटायला गेल्या. पटेल, पवार, तटकरे यांनी काही शिकावे असा हा प्रसंग आहे. 

Web Title: NCP ran away by giving a 'blame' to Bhujbal - Uddhav Thackeray

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.