राष्ट्रवादी स्वतंत्र लढण्याच्या तयारीत?
By admin | Published: September 6, 2014 02:07 AM2014-09-06T02:07:23+5:302014-09-06T02:07:23+5:30
काँग्रेस आणि राष्ट्रवादीत गेल्या 15 दिवसांत काहीही चर्चा न झाल्याने राष्ट्रवादीने आता विधानसभा निवडणुका स्वतंत्र लढण्याचा विचार पक्का केला आहे.
Next
मुंबई : काँग्रेस आणि राष्ट्रवादीत गेल्या 15 दिवसांत काहीही चर्चा न झाल्याने राष्ट्रवादीने आता विधानसभा निवडणुका स्वतंत्र लढण्याचा विचार पक्का केला आहे. काँग्रेसतर्फे भूमिका स्पष्ट नाही, कोणी चर्चा करण्यासही तयार नाही, आम्ही जरी एकत्र लढलो तरी आमची सत्ता महाराष्ट्रात येऊ शकत नाही हे आम्हालाही माहिती आहे पण वेगळे लढलो तर किमान 5क् जागा तरी आम्ही जिंकू आणि राज्यभर पक्ष बांधणी करता येईल असा विचार आता राष्ट्रवादीत वाढत चालल्याचे एका ज्येष्ठ नेत्याने ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.
मुंबईत काही ज्येष्ठ संपादकांशी बोलताना त्या नेत्याने काँग्रेसच्या व मुख्यमंत्र्यांच्या कार्यपद्धतीवर तीव्र शब्दांत नाराजीदेखील व्यक्त केली. राष्ट्रवादी आणि काँग्रेसची 15 दिवसांपूर्वी दिल्लीत बैठक झाली होती. 2क्क्9च्या निवडणुकीत काँग्रेसचे खासदार जास्त होते त्यामुळे त्यांनी विधानसभेच्या जास्त जागा मागून घेतल्या होत्या. आम्हीदेखील त्या दिल्या होत्या. आता त्याच पद्धतीने आमच्या लोकसभेच्या जागा जास्ती आहेत म्हणून विधानसभेसाठी जास्त जागा मिळाव्यात एवढीच आमची अपेक्षा आहे. काँग्रेसचे दिल्लीतील नेते अहमद पटेल आणि ए.के. अॅन्टोनी यांनी या प्रस्तावावर विचार करून पुन्हा भेटू असे सांगितले. मात्र त्यांच्याकडून अजूनही काही उत्तर आलेले नाही.
जास्ती जागा मिळत असतील तरच आघाडी करावी असे आमच्या पक्षात सगळ्या ज्येष्ठ नेत्यांचे मत आहे मात्र काँग्रेस विनाकारण वेळकाढू धोरण घेत आहे. वेळेवर जागा निश्चित करून उमेदवार ठरवले गेले तर प्रचाराला गती देता येईल मात्र काँग्रेसच्या धीम्या गतीने आम्ही धावू शकणार नाही. आम्ही न थांबता आमच्या निवडणूक कामाला सुरुवात केली आहे. आम्ही 288 विधानसभा मतदारसंघांसाठीची तयारी सुरू केल्याचेही त्या नेत्याने स्पष्ट केले. तशा स्थितीत आम्हाला किमान 5क् जागा मिळतील व निवडणुकीनंतर आम्हाला सर्व पर्याय खुले राहतील. भाजपादेखील युतीच्या गोष्टी करीत असली तरी त्यांनाही या वेळी वेगळे लढायचे आहे. त्यामुळे कालच्या शहा-उद्धव भेटीचा अर्थ दोघे एकत्र आले असा होत नाही. सगळेच वेगवेगळे लढले तर राज्यात पंचरंगी लढती होतील व निकालानंतर जे पर्याय समोर येतील त्यात आमचाही मार्ग खुला असेल, असेही तो नेता म्हणाला.
पुढच्या काळात काँग्रेसपुढे नेतृत्वाचा मोठा प्रश्न उभा राहणार आहे. आमच्याकडे नेतृत्वाची कमतरता नाही. मुख्यमंत्र्यांच्या निर्णय दिरंगाईमुळे अनेक कामे रखडल्याचा आरोपही त्या नेत्याने केल्याने आघाडीत सारेकाही आलबेल नसल्याचे चित्र आहे. आम्हालाही आघाडी हवी आहे मात्र जास्त जागा मिळत असतील तरच. उद्या राष्ट्रवादीतर्फे विधानसभा प्रचाराचा नारळ पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत फुटणार आहे.